उदयनराजेंची मुख्यमंत्र्यांनी केली मागणी मान्य

सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) : शिवकालीन गडकोट किल्ले, वास्तूंच्या जतन, संवर्धन आणि संरक्षणासाठी शिवनेरी, प्रतापगड, अजिंक्यतारा किल्ल्यांवर रोप-वे तसेच विविध विकास कामे होण्यासाठी स्वतंत्र प्राधिकरण निर्माण करण्‍याची मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे खासदार उदयनराजेंनी केली होती. यानुसार श्री. शिंदे यांनी गडकोटांच्या संवर्धनासाठी स्वतंत्र महामंडळ स्थापना करण्याची केलेली घोषणा ही आमच्यासह प्रयत्नांना यश देणारी असल्‍याचे खासदार उदयनराजे भोसले यांनी म्हटले आहे.

शिवकालीन गडकोट किल्ले, वास्तू आपल्या पूर्वजांच्या शैार्याची आणि पराक्रमाची यशोगाथा सांगतात. युगपुरुष शिवशंभू राजांच्या पराक्रमाचे साक्षीदार असणाऱ्या वास्तूंच्या जतन, संवर्धन आणि संरक्षणासाठी शिवनेरी, प्रतापगड, अजिंक्यतारा येथे रोप-वेसह, परिसर विकास साधण्‍यासाठी स्वतंत्र महामंडळ निर्माण करण्‍याची मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे आम्ही केली होती.

पत्रकात उदयनराजेंनी म्हटले की, मुख्‍यमंत्री एकनाथ शिंदे यांना आम्‍ही १० सप्‍टेंबर रोजी गडकोट, शिवकालीन वास्तूंच्या संवर्धन, जतन करण्‍यासाठी स्वतंत्र महामंडळ स्‍थापण्‍याची मागणी निवेदनाद्वारे केली होती. मराठ्यांचा अजरामर इतिहासाची साक्ष असणारे गडकोट किल्ले यांच्या संरक्षणाची शिवप्रेमींप्रमाणेच राज्य सरकारचे पहिले कर्तव्य आहे, असे आमचे मत आहे.

शिवनेरी छत्रपती शिवाजी महाराजांचे जन्मस्थान असून, त्‍यासह किल्ले प्रतापगड, किल्‍ले अजिंक्‍यतारा येथेही रोप वे आवश्‍‍यक असल्‍याचे आम्‍ही निवेदनात नमूद केले होते. अजिंक्‍यताऱ्याबरोबरच राजगड, रायगड येथे तत्‍कालीन मराठी साम्राज्‍याच्‍या राजधान्‍या होत्‍या. अजिंक्यतारा राजधानी असतानाच मराठा साम्राज्याचा अटकेपार झेंडा फडकविण्यात आला होता.

हे किल्‍ले, गडकोट व वास्तूंच्या पडझडीबाबत आम्‍ही नुकतीच श्री. शिंदे यांची भेट घेत शिवनेरी, प्रतापगड, अजिंक्यताऱ्यासह गडकोट, किल्ल्यांच्या संरक्षण आणि संवर्धन विकासाबाबत स्वतंत्र महामंडळ स्थापन करण्‍याबाबत चर्चा केली होती. चर्चेनुसार श्री. शिंदे यांनी गटकोट-किल्ल्यांच्या विकासाकरिता स्वतंत्र महामंडळ स्थापन करण्याची घोषणा केली आहे. ही घोषणा आमच्‍या, तसेच शिवप्रेमींच्या प्रामाणिक प्रयत्नांना साथ देणारी बाब असल्‍याचे मत उदयनराजेंनी प्रसिद्धीस दिलेल्‍या पत्रकात नमूद केले आहे.

error: Content is protected !!