सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) : बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाशी संलग्न कृषी महाविद्यालय दापोलीची विद्यार्थिनी कृषिकन्या अबोली संजय भागडे हिने ग्रामीण कृषी जागरूकता आणि कृषी औद्योगिक कार्यानुभव कार्यक्रम अंतर्गत शेतातील टाकाऊ पाईप पासून शून्य खर्चात उसाचे पाचट काढणी हातयंत्र बनवले. चिमणगाव ता. कोरेगाव येथील कृषीकन्येच्या या हातयंत्राची सध्या तालुक्यातील शेतकऱ्यांमध्ये चांगलीच चर्चा असून शेतकऱ्यांना हे यंत्र फायदेशीर ठरत आहे.
या हातयंत्राने पाचट काढल्याने लोकरी माव्याचे करता येणारे नियंत्रण, शेतातच तयार होणारे सेंद्रिय खत, ऊस उत्पादनात होणारी वाढ, ऊसाच्या वेगवेगळ्या जाती मध्ये पाचट काढण्याचे होणारे फायदे आणि घ्यावयाची काळजी आदी गोष्टींचे मार्गदर्शन अबोली भागडे ही शेतकऱ्यांना रत आहे. या उपक्रमासाठी तिला कृषि महाविद्यालय दापोलीचे सहयोगी अधिष्ठाता डॉ महाडकर, डॉ. थोरात कार्यक्रम अधिकारी डॉ. राजेमहाडिक आदींचे मार्गदर्शन लाभले.
केवळ दोन फूट लांबीच्या टाकाऊ पाईप पासून बनवलेल्या या पाचट काढणी हातयंत्रामुळे कमी वेळेत जास्त काम करता येते. कामाची गुणवत्ता वाढते. एकूण मजुरांवरील खर्च कमी होतोउसाच्या पानांमुळे हाताला जखमा होत नाहीत आणि पाचट काढल्याने हवा खेळती राहते त्यामुळे ऊसाची जाडी वाढण्यास मदत होते. पाचट काढल्यामुळे कांडी किड, लोकरी मावा तसेच पायरीला या किडीचा प्रादुर्भाव कमी होतो पाचट अच्छादन केल्यामुळे तनाचा प्रादुर्भाव कमी होतो व जमिनीचे तापमान नियंत्रित ठेवण्यास मदत होते. त्यामुळे या बिन खर्चाच्या पाचट काढणी हातयंत्राचा वापर शेतकऱ्यांनी करावा असे आवाहन अबोली संजय भागडे हिने केले आहे.