कोरोनाचा नवा अवतार

कुणीही काहीही म्हटले, तरी कोरोना हाच आजही आपल्यापुढील प्राधान्यक्रमाचा प्रश्न आहे; किंबहुना असायला हवा. गेल्या काही दिवसांपासून देशभरात दररोज आढळणाऱ्या रुग्णांची संख्या तर झपाट्यानं वाढत आहेच; शिवाय त्यातील निम्मेअधिक रुग्ण आपल्या राज्यात आढळत आहेत. देशात आणि राज्यात मृत्युदरही पुन्हा वाढत चालला आहे. नेमक्या याच वेळी राज्याचे प्राधान्यक्रमच जणू बदलले आहेत. राजकीय पटलावर घनघोर अंधार पसरलेला आहे. कुस्त्यांच्या फडात दररोज नवीन डावपेच रंगत चालले आहेत आणि कुणीच मागे हटायला तयार नाही.

आधी सारे मिळून कोरोनाशी लढू आणि नंतर हवे तर एकमेकांच्या उरावर बसू, असेही म्हणायला कुणी तयार नाही. इकडचे आणि तिकडचे एकमेकांचे वाभाडे काढत सुटले आहेत आणि ‘राजकीय भूकंप’ वगैरे होण्याची वाट पाहणे चालले आहे. नागरिकसुद्धा करमणूकप्रधान कार्यक्रम पाहिल्याच्या थाटात टीव्हीवर या सर्व घटना पाहत आहेत. कोरोनाची आकडेवारी मात्र मख्खपणे पाहत आहेत. पुन्हा लॉकडाउन लागणार का? हा प्रश्न लोकांच्या पोटात गोळा आणतो आहे आणि ते स्वाभाविकही आहे. जगूही देईना आणि मरूही देईना, असा हा कोरोनाचा राक्षस वर्षापेक्षा अधिक काळ आपल्या भोवती पिंगा घालत असताना आजाराने मरायचे की भुकेने, हा केविलवाणा प्रश्न बहुतांश जनतेसमोर उभा आहे. आजार झाल्यास वाचण्याची शक्यता आहे; पण हात बंद राहिला तर पोराबाळांना खायला काय घालणार? ही तडफड ‘जावे त्यांच्या वंशा…’ तेव्हाच कळते.

तूर्तास गांभीर्याने विचार करण्याजोगा मुद्दा म्हणजे, आपल्या देशात आढळलेली कोरोनाची ७७१ नवीन प्रतिरूपे म्हणजेच व्हेरिएन्ट्स! यातील ७३६ प्रतिरूपे ब्रिटनमधून तर ३४ दक्षिण आफ्रिकेतून आलेली आहेत. जागतिकीकरणाच्या या युगात जगापासून फार काळ तुटक राहता येत नाही आणि दरवाजे उघडावेत तर ही प्रतिरूपे देशात घुसतात. या नव्या प्रतिरूपांचा प्रसार अतिवेगाने होत असून, रोगप्रतिकार शक्तीही त्यांची वाट रोखण्यास असमर्थ आहे, असे सांगण्यात येते. म्हणजेच हा दुहेरी धोका आहे. जगभरातील आकडेवारी पाहिली असता, आतापर्यंत कोरोनाच्या विषाणूचे साडेपाच हजारांपेक्षा अधिक वेळा परिवर्तन म्हणजे म्युटेशन झाले आहे. विषाणूंची जी प्रतिरूपे भारतात नुकतीच आढळून आली आहेत, त्यांना ‘डबल म्युटेड व्हेरिएन्ट’ असेही नाव दिले गेले आहे. नव्या व्हेरिएन्ट्सचा शोध घेण्यासाठी देशातील दहा प्रयोगशाळांचा एक गट तयार करण्यात आला होता आणि त्याला ‘इन्साकॉग’ नाव देण्यात आले होते. २५ डिसेंबर २०२० रोजी हा समूह स्थापन झाला होता आणि विषाणूंच्या फैलावाचे विश्लेषण ‘जीनोम सिक्वेन्सिंग’च्या माध्यमातून करणे हे या समूहाचे काम आहे. वेगवेगळ्या राज्यांनी पाठविलेल्या १० हजार ७८७ नमुन्यांचे विश्लेषण केल्यानंतर या समूहाने ७७१ नवे व्हेरिएन्ट तयार झाल्याचा निष्कर्ष काढला आहे. सध्या कोरोनाचे रुग्ण वाढण्याचा प्रचंड वेग आणि मृत्युदरात झालेली वाढ पाहता या मुद्द्यांकडे आपण सर्वांनी गांभीर्याने पाहायला हवे आणि नियमांचे पालन करून विषाणूशी लढा सुरू ठेवला पाहिजे. राजकीय सर्कशीचा आणि विविध ‘गुण’दर्शनाचा आस्वाद जगलो-वाचलो तर घेऊच!

error: Content is protected !!