गारपीठग्रस्त भागाची पाहणी

सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) : कोरेगाव तालुक्याच्या उत्तर भागामध्ये बुधवारी दुपारी झालेल्या गारपीठमुळे शेतीचे मोठे नुकसान झाले. आज आमदार दीपक चव्हाण, प्रांताधिकारी ज्योती पाटील, तहसीलदार अमोल कदम, गटविकास अधिकारी क्रांती बोराटे, तालुका कृषी अधिकारी बापूसाहेब शेळके यांनी नुकसानग्रस्त भागाची पाहणी करण्यात आली. तसेच तातडीने पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याबाबतची ग्वाही दिली

कोरेगाव तालुक्यातील भाडळे, वाठारस्टेशन, पिंपोडे, अनपटवाडी परिसरात बुधवारी झालेल्या गारपिटीने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. अवकाळी पाऊस व गारपिटीने कलिंगड, गोट कांदा, ऊस, मिरची, भुईमूग इत्यादी पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. आमदार दिपक चव्हाण यांनी आज नुकसानग्रस्त शेतीची पाहणी केल्यानंतर शेतकऱ्यांशी संवाद साधला. गारपिटीने झालेले नुकसान खूप मोठे आहे. शेतात अर्धा ते पाऊण फूट गारांचा थर साठला होता. त्यामुळे पिकं अक्षरशः नासून गेली आहेत. गोट कांद्याच्या फुलांचा जमिनीवर खच पडला होता.तर ऊस पिकाच्या पानाच्या चिंध्या झाल्या आहेत. निसर्गाचे हे तांडव शेतकऱ्यांना उघड्या डोळ्यानी पाहत रहावे लागले. लाखो रुपयांचा केलेला खर्च मातीमोल झाल्याने अनेक शेतकऱ्यांना अश्रू अनावर झाले होते. सरकारने भरीव मदत देऊन शेतकऱ्यांना उभारी द्यावी अशी अपेक्षा शेतकरी व्यक्त करीत आहेत.

यावेळी पंचायत समितीचे उपसभापती संजय साळुंखे, नागेश जाधव, पिंपोडे बुद्रुकचे सरपंच नैनेश कांबळे, तालुका कृषी अधिकारी बापूसाहेब शेळके, मंडलाधिकारी उमेश डोईफोडे उपस्थित होते. गारपिटीने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांचे वस्तुनिष्ठ पंचनामे करून शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मदत कशी मिळेल यासाठी महसूल व कृषी विभागाच्या अधिकारी कर्मचाऱ्यांना प्रयत्न करावेत. त्यासाठी सरकार दरबारी आवश्यक असलेली सर्व मदत मी स्वतः तातडीने कार्यवाही करीन अशी ग्वाही चव्हाण यांनी दिली.

error: Content is protected !!