सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) : राष्ट्रवादीचे विधानपरिषदेचे आमदार शशिकांत शिंदे यांचा विधानसभेच्या निवडणुकीत शिवसेनेच्या महेश शिंदे यांनी पराभव केला. तेव्हापासून शशिकांत शिंदे यांनी कोरेगाव मतदारसंघातील संपर्क कमी केला होता. तेव्हापासून त्यांनी नवी मुंबई आणि माथाडी याच्या स्वतःला गुंतवून घेतले होते. कार्यकर्त्यांनी तशी नाराजी व्यक्त केली होती. त्यामुळे राष्ट्रवादीचे नेत्यांची अडगळीत पडल्यासारखी अवस्था झाली होती. शशिकांत शिंदेही मतदारसंघात मोर्चे बांधणी करण्याची संधी शोधत होते. दरम्यान, गेल्या आठवड्यात जरंडेश्वर साखर कारखान्यावर ईडीने कारवाई केल्याने शशिकांत शिंदे यांनी निमित्त मिळाले असून त्यांनी भाजप आणि ईडीच्या कारवाईचा निषेध करण्यासाठी मतदारसंघात विभागनिहाय बैठकांचे नियोजन केले असून पुन्हा पिंजून काढण्यास सुरुवात केली आहे.
जरंडेश्वर कारखान्यासाठी शनिवारी कोरेगाव तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला होता. त्यानंतर वडाचीवाडी, ता. कोरेगाव येथे सभेचे आयोजन करण्यात आले. तसेच आरफळ ता. सातारा येथे ‘पाटखळ-शिवथर’ विभागातील ऊसउत्पादक शेतकरी, कारखाना कामगार व वाहतूकदार यांची बैठक बोलावली होती.
यावेळी शशिकांत शिंदे यांनी जरंडेश्वर साखर कारखाना सुरुच राहिला पाहिजे, ईडीने जर राजकीय खेळातून जरंडेश्वर कारखाना बंद पाडण्याचा प्रयत्न केल्यास, ईडीला सातारा जिल्ह्यातील शेतकर्यांची ताकद निश्चितपणे दाखवून देऊ, असा स्पष्ट इशारा ऊसउत्पादक शेतकरी, वाहतूकदार व कामगार यांच्या बैठकीत बोलताना दिला.
या मेळाव्यात कार्यकर्त्यांना विचारात घेऊन गावनिहाय मोहीम हाती घेतली जाणार असल्याची घोषणा केली. ज्याप्रमाणे ग्रामपंचायत, पंचायत समिती आणि जिल्हा परिषद निवडणुकीत कार्यकर्ते घरोघरी जाऊन आपले विचार मांडतात, त्याच धर्तीवर कारखाना कसा होता आणि आता काय परिस्थिती आहे, हे शेतकर्यांना पटवून दिले जाणार आहे. प्रत्येक तालुक्यामध्ये गावनिहाय बैठकांचे नियोजन केले जाणार आहे.
You must be logged in to post a comment.