सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) : राज्य सहकारी बँकेने विक्री केलेल्या साखर कारखान्यांप्रकरणी ईडीने जी कारवाई सुरू केली आहे. जरंडेश्वर कारखान्याप्रकरणी गुरुवारी ईडीने राज्य सहकारी बँकेत जाऊन कारखान्यांच्या विक्री व्यवहार प्रकरणांची कागदपत्रे ताब्यात घेतल्याची खात्रीलायक बातमी आहे.सक्त वसुली संचालयाने काही दिवसांपूर्वी जरंडेश्वर कारखान्यावर धाड टाकली होती आणि कारवाई केली होती. या कारवाईचा पुढचा भाग म्हणून अधिक तपासासाठी ईडीने कारखाना विक्रीची कागदपत्रे ताब्यात घेतली आहेत.
याच प्रकरणामध्ये यापूर्वी ईडीने जरंडेश्वर शुगर मिलला कर्जपुरवठा केलेल्या सातारा जिल्हा मध्यवर्ती बँक तसेच राज्य सहकारी बँकेला ईडीची नोटीस दिली होती. मात्र, जरंडेश्वर शुगर मिलला केलेला कर्जपुरवठा हा रीतसर पध्दतीने केला होता, असे बँकेतर्फे स्पष्ट करण्यात आले होते.दरम्यान, जरंडेश्वर सहकारी साखर कारखान्याचा लिलाव हा चुकीच्या पध्दतीने झाला असून त्याची योग्य यंत्रणेबाबत चौकशी करण्यात यावी, अशी मागणी कारखान्याच्या अध्यक्षा माजी आमदार शालिनीताई पाटील केली होती. तसेच उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यानंतर जरंडेश्वर शुगर मिलला कर्जपुरवठा करणाऱ्या बँकांची ईडीने चौकशी सुरु केली.
थकित कर्जामुळे राज्य सहकारी बँकेने जरंडेश्वर या सहकारी साखर कारखान्यावर जप्ती आणली होती. त्यानंतर या कारखान्याचा लिलाव झाला होता. हा कारखाना उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जवळच्या नातेवाईकाने घेतल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर ईडीने चौकशीचे फास आवळले.
You must be logged in to post a comment.