झेड्पीच्या सभेत कोंबड्या वाटप, बोगस अभियंता अन् आरोग्य केंद्राच्या जागेवरुन सदस्यांमध्ये हमरातुमरी

सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) : जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत बोगस अभियंत्ये, पशुसंवर्धन विभागाने वाटप केलेल्या कोंबड्या, प्राथमिक आरोग्य केंद्र आदीं विषयांवरून सदस्यांमध्ये हमरीतुमरीही झाल्याचे पहावयास मिळाले.

जिल्हा परिषदेच्या दिवंगत यशवंतराव चव्हाण बहुउद्देशिय सभागृहात सर्वसाधारण सभा पार पडली. अध्यक्ष उदय कबुले यांच्या अध्यक्षतेखाली सभा झाली. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा, उपाध्यक्ष प्रदीप विधाते, प्रशासनचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी मनोज जाधव, ग्रामपंचायतचे अविनाश फडतरे, अर्थ व शिक्षण समिती सभापती मानसिंगराव जगदाळे, कृषी सभापती मंगेश धुमाळ, समाजकल्याण समिती सभापती कल्पना खाडे, महिला व बालकल्याण सभापती सोनाली पोळ आदी उपस्थित होते.  

सभेत सदस्य दीपक पवार यांनी कोंबडी वाटपाचा विषय उपस्थित केला. कोणाला जादा कोंबड्या दिल्या का सांगा? नाहीतर मी सातारा तालुक्यातील लाभार्थ्यांच्या घरी जाऊन कोंबड्या आहेत का ते तपासणार आहे. यावर जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. संजय शिंदे यांनी कोणालाही जादा वाटप केले नसल्याचे सांगितले. पण, पवार यांनी लाभार्थी यादी द्या. मी दोन-तीन बॉडी गार्ड बरोबर घेऊन तपासणीला जाणारच असे पुन्हा स्पष्ट केले. यामुळे सर्वत्र हशाच पिकला. यावर सभापती मंगेश धुमाळ यांनी कोंबडी वाटपात अधिकाऱ्यांनी कायदा व नियम तोडून काम केले नसल्याचे स्पष्टपणे सांगितले.

सदस्य निवास थोरात यांनी कोपर्डे हवेली प्राथमिक आरोग्य केंद्राचा विषय उपस्थित केला. केंद्राला योग्य जागा सुचित करुन मंजुरीला पाठवावी, असे स्पष्ट केले. यावर सदस्य शिवाजी सर्वगोड यांनी पुढील विषय घ्या असे म्हटले. यावरुन थोरात यांनी असं पाठीमागून बोलायचं नाही, अध्यक्ष उत्तर देतील, असे सांगितले. तर सदस्य अरुण गोरे यांनीही मागून बोलायचे काम नाही, असे स्पष्ट केले. त्यामुळे काहीक्षण तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

जिल्हा परिषदेच्या सलग दुसºया सर्वसाधारण सभेत अभियंत्यांच्या शैक्षणिक अर्हतेचा मुद्दा जोरात गाजला. सदस्यांनी बोगस अभियंते सापडले का ? चौकशी कुठपर्यंत आली, असा सवाल केला. यावर मुख्य कार्यकारी अधिकाºयांनी खोटी कागदपत्रे सादर केलेले अभियंते शोधण्यासाठी समिती तयार केली आहे. १५ दिवसांत अहवाल देऊ, असे आश्वासन दिले. दरम्यान, याच सभेत सातारा मेडिकल कॉलेजला यशवंतराव चव्हाण यांचे नाव देण्याचा व जिल्हा शासकीय रुग्णालयात क्रांतिसिंह नाना पाटील यांचा पुतळा उभा करण्याचा ठराव एकमताने करण्यात आला. 

error: Content is protected !!