सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) : दारु पिल्याच्या कारणावरून पती-पत्नीमध्ये झालेल्या वादामध्ये पतीने पत्नीला लाकडी दांडक्याने मारहाण केली. या मारहाणीत पत्नीचा जागीच मृत्यू झाला. ही सातारा तालुक्यातील नागठाणे येथे घटना मंगळवारी सकाळी उघडकीस आली आहे. याप्रकरणी बोरगाव पोलिसांनी बबन गायकवाड (वय ६०, रा. नागठाणे) याला ताब्यात घेतले आहेत. मालन बबन गायकवाड (वय ५५, ता. सातारा) असे मृत झालेल्या महिलेचे नाव आहे.
याबाबत माहिती अशी, मालन गायकवाड आणि बबन गायकवाड हे दाम्पत्य मुळचे वाई तालुक्यातील दूंद या गावचे आहेत. मात्र, सुमारे तीस वर्षांपासून हे दोघे नागठाणे येथे मोलमजुरीच्या निमित्ताने वास्तव्य करत आहेत. दारुच्या व्यसनामुळे पती पत्नीमध्ये वाद व्हायचे. मंगळवारी रात्रीही जेवण झाल्यानंतर वाद झाला. हा वाद विकोपाला गेल्यानंतर संतप्त झालेल्या बबन गायकवाडने लाकडी दांडक्याने पत्नीला बेदम मारहाण केली. या मारहाणीत पत्नीचा जागीच मृत्यू झाला. कॉटवर रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या पत्नीच्या शेजारीच पती झोपी गेला. सकाळी उठवल्यानंतर तो थेट कामावर गेला. तेथे त्याने पत्नी पडली असून, झोपेतून उठत नाही, असे सांगितले. त्यानंतर याची माहिती आजूबाजूला समजल्यानंतर नागरिकांनी त्यांच्या घराकडे धाव घेतली. त्यावेळी मालन गायकवाड या रक्ताच्या थोरोळ्यात पडल्या होत्या. बोरगाव पोलिसांना याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी जाऊन चौकशी सुरू केली. त्यावेळी पती बबन गायकवाड याने पत्नीचा खून केल्याची कबुली दिली. त्यानंतर त्याला अटक करण्यात आली. सहायक पोलीस निरीक्षक डॉ. सागर वाघ हे अधिक तपास करत आहेत.
You must be logged in to post a comment.