सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) : शासनाच्या माध्यमातून घरकुलापासून वंचित असलेल्या पारधी, गोपाळ, कातकऱयांसह ज्यांना घरेच नाहीत अशा मराठा समाजातील बांधवांना घरकूल मिळण्यासाठी आपण स्वतः मंत्रालयीन पातळीवर प्रयत्न करुन राज्य सरकारकडे पाठपुरावा करु, अशी ग्वाही आमदार शशिकांत शिंदे यांनी लोकशाहीर अण्णाभाऊ कृती समितीच्या पारधी हक्क अभियानाच्या शिष्टमंडळास दिली.
लोकशाहीर अण्णाभाऊ कृती समितीच्या पारधी हक्क अभियानाचे नेते उमेश चव्हाण यांनी आमदार शशिकांत शिंदे यांची भेट घेतली. सातारा जिल्हय़ात शासनाच्या घरकूल योजना राबवाताना ज्यांना घरेच नाहीत अशा सर्व जातीतील लाभार्थींचा विचार केला जात नाही. पारधी, कातकरी, गोपाळ, दलित समाजातील लोकांसाठी असलेल्या योजनांबाबतही हीच स्थिती असल्याचे उमेश चव्हाण यांनी आमदार शिंदे यांच्या निदर्शनास आणून दिले.
ग्रामस्तरावर पारधी समाजाचे पुनर्वसन करण्यासाठी गावांकडून, ग्रामपंचायतीकडून सहकार्य केले जात नाही. त्यामुळे ज्यांना घरेच नाहीत अशा सर्वांचे पुनर्वसन एकाच ठिकाणी जागा पाहून तिथे करावे व त्यांना तिथे सर्व मुलभूत सुविधा उपलब्ध करुन द्याव्यात. त्यासाठी शासनाने ठरवले तर खूप काही होवू शकते, असे चव्हाण यांनी सांगितले. त्यावर आमदार शिंदे यांनी शासनाच्या घरकूल योजनेबाबत आपण निश्चितपणे पाठपुरावा करु. सातारा जिल्हय़ातील सर्व जातीधर्मातील ज्यांना घरे नाहीत अशा सर्वांसाठी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे कृती समितीच्या माध्यमातून प्रयत्न सुरु असून त्याबाबतही मंत्रालय पातळीवर प्रयत्न करुन जिल्हा प्रशासनाकडून याबाबत कार्यवाही करण्यासाठी आपण आग्रही राहू, असे सांगितले.
यावेळी कृती समितीच्या सुजाता गायकवाड, विमल शिंदे, नम्या भोसले, डिया भोसले, राजा भोसले, यंत्र्या भोसले, रघुनाथ सकट, आकाताई भोसले, रुपिता पवार, अमरशेख भोसले, खुदा भोसले, माकेश भोसले, अरुणा भोसले तसेच पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
You must be logged in to post a comment.