सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) : सातारा – पंढरपूर महामार्गालगत शिंदेवाडी (कटगुण, ता. खटाव) येथील कंपनीला सकाळी सात वाजता आग लागली. या आगातील कंपनीतील कच्चा व पक्का असा दोन्ही प्रकारातील माल जळून खाक झाला असून यात कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे.
याबाबत माहिती अशी की, खटाव तालुक्यातील शिंदेवाडी आणि निढळ या दोन्ही गावाच्या मधोमधच माळरानावर असलेल्या डुरीयम डोअर्स इंडस्ट्रीज कंपनीला आग लागली. दरम्यान ही आग लागल्याचे समजताच ग्रामस्थांनी कंपनीकडे धाव घेतली. स्थानिक पाण्याच्या टँकरच्या साहाय्याने आग विझविण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले त्यावेळी मोठया प्रमाणावर लाकूड तसेच प्लास्टिक जळत असल्यामुळे कंपनीतून आगीचे डोंब निघत होते. अग्निशमन दलाने आग विझवण्यासाठी शर्तीचे प्रयत्न केले. दोन बंबांनी आग आटोक्यात आणली. या आगीमध्ये सुदैवाने कुठलीही जीवितहानी झाली नाही. मात्र, प्लायवूड दरवाजे, लाकडी साहित्य, मशनरी जळून खाक झाली आहे. तसेच ही आग नेमकी लागली कशामुळे याबाबत अद्यापही माहिती मिळू शकली नाही. आगीमध्ये कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले असून घटनास्थळी पुसेगाव पोलिस स्टेशनचे अधिकारी व कर्मचारी दाखल झाले होते.
You must be logged in to post a comment.