पोलीस अधीक्षकांवर गंभीर आरोप करीत कर्मचाऱ्याचा आत्महत्येचा प्रयत्न

सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) : आजारपण असताना मागणीनुसार बदलीचे ठिकाण न मिळाल्याने वाहतूक शाखेचे पोलीस कर्मचारी विजय चंद्रकांत माळी यांनी थेट सातारा पोलीस अधीक्षकांवर आरोप करून विषारी औषध पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. या व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल झाल्यानंतर जिल्हा पोलीस दलात प्रचंड खळबळ उडाली आहे.

याबाबत माहिती अशी की, सातारा शहर वाहतूक शाखेमध्ये विजय माळी हे वाहन चालक म्हणून कार्यरत आहेत. सोमवारी खातेअंतर्गत पोलिसांच्या बदल्या झाल्या. या बदल्यांमध्ये अनेक पोलिसांना मनासारखी बदली मिळाली नाही. त्यापैकी एक असणाºया माळी यांनी व्हिडीओ बनवून सोशल मीडियावर अपलोड केला. यामुळे जिल्हा पोलीस दलात एकच खळबळ उडाली. व्हिडीओमध्ये माळी म्हणतायत, नमस्कार, मी समक्ष जेव्हा मुलाखतीला गेलो. तेव्हा शाहूपुरी पोलीस ठाणे आणि डॉग स्कॉड इथे बदली लिहिण्यात आली होती. पण माझी बदली माण तालुक्यातील म्हसवडमध्ये करण्यात आली. त्यामुळे मी स्वत: सोमवारी पोलीस अधीक्षकांना भेटण्यासाठी गेलो. त्यावेळी त्यांनी तुम्हाला म्हसवडला जावे लागेल, असे सांगितले. यावर मी त्यांना माझ्या मणक्याचा, शुगर, बीपीच्या आजाराचे उपचार साताºयात सुरू आहेत, असे सांगितले. मात्र, तरीही ते म्हणाले, तुम्हाला जावेच लागेल. तेथे तीन  चालक आहेत, असे सांगूनही ते म्हणाले, तुम्हाला जावेच लागेल. परंतु त्यांनी माझी विनंती अमान्य केली. कुणाची तरी मर्जी राखण्यासाठी माझी म्हसवड या ठिकाणी बदली करण्यात आली आहे. माझे कुटुंब माझ्या पगारावर अवलंबून आहे.

मी साताºयातील एमटी (वाहन) विभागात बदली मागितली आहे. मात्र, या ठिकाणी मला बदली देण्यात आली नाही. माझ्यावर अन्याय झाला आहे म्हणून मी माझे जीवन आज संपवत आहे. जयहिंद, असे त्यांनी शेवटी व्हिडीओमध्ये म्हटले आहे. दरम्यान, माळी यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची धावाधाव सुरू झाली. माळी यांचा शोध घेण्यासाठी पोलीस कर्मचारी मंगळवारी सकाळी त्यांच्या घरी गेले. मात्र, तोपर्यंत माळी यांनी विषारी औषध प्राशन केले होते. त्यानंतर त्यांना तत्काळ जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

error: Content is protected !!