पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुतेंची होणार चौकशी

सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) :- सोलापूर ग्रामीणच्या पोलीस अधीक्षक व साताऱ्याच्या तत्कालीन एसपी तेजस्वी सातपुते यांच्याविरोधात बालाजी चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष राजेंद्र चोरगे यांनी केलेल्या तक्रारीची दखल घेत राज्य पोलीस तक्रार प्राधिकरणाने दि.१४ जानेवारीला निवृत्त न्यायमूर्ती श्रीहरी डावरे यांच्यासमोर एसपी तेजस्वी सातपुते यांना चौकशीकामी हजर होण्याचे आदेश दिले आहेत. तसेच तक्रारदार चोरगे यांनाही उपस्थित राहण्याबाबत कळवण्यात आले आहे.

याबाबत अधिक माहिती अशी, साताऱ्यातील सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र चोरगे यांच्या गुरुकुल स्कूल व्यवस्थापनासंबंधी वादविवाद झाले होते. त्यामध्ये एलसीबीचे तत्कालीन पोलिस निरीक्षक पद्माकर घनवट यांनी बेकायदेशीर काम केल्याचा चोरगे यांचा आक्षेप होता. त्याबाबत त्यांनी तत्कालीन पोलिस अधीक्षका पंकज देशमुख यांच्याकडे तक्रारीदेखील केल्या होत्या. त्याची देशमुख यांनी चौकशी करून अहवाल आला असता देशमुख यांची पुणे येथे बदली झाली. त्यांच्या जागी तेजस्वी सातपुते रुजू झाल्या.

त्यांनी पहिल्या चौकशीचा अहवाल बाजूला ठेवून त्यांनी पुन्हा नव्याने चौकशी केली. आणि पद्माकर घनवट यांना क्लिन चिट केली. चोरगे यांच्या त्या तक्रारींकडे दुर्लक्ष करून संबंधित अधिकाऱ्याला पाठीशी घातल्याची भावना झाल्याने चोरगे यांनी राज्य पोलीस तक्रार प्राधिकरणाकडे दाद मागितली होती. चोरगे यांच्या तक्रार अर्जाची दखल घेत राज्य पोलीस तक्रार प्राधिकरणाने दि.14 जानेवारी
रोजी एसपी सातपुते यांना निवृत्त न्यायमूर्ती श्रीहरी डावरे यांच्या खंडपीठासमोर चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. या घटनेमुळे आयपीएस वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. हे प्राधिकरण मुंबईत कार्यरत असून, तिथे वर्षाकाठी ३०० हून अधिक तक्रारी येतात.

सर्वसामान्य नागरिक एका पानावर तक्रार नोंदवून ती वेबसाइटवर असलेल्या प्रतिज्ञापत्राच्या मसुद्याप्रमाणे टपालाद्वारे एसपीसीएच्या कार्यालयात पाठवू शकतो. एसपीएसचे कामकाज सेवानिवृत्त न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखाली चालते. राज्यभरात १५१ अधिकारी एसपीसीएचे कामकाज सांभाळतात. पोलिसांकडून धमकी देणे, मानसिक वा आर्थिक तसेच शारिरीक छळ करणे, बेकायदेशीर अटक करणे, तक्रारीची दखल न घेणे, विनाकारण चौकशी करणे अथवा तशी धमकी देणे, तपासाबाबत संशय असल्यास नागरिक एसपीसीएकडे दाद मागू शकतात. त्यात दोषी आढळल्यास संबंधितावर थेट कारवाई होऊ शकते.

error: Content is protected !!