माण बाजार समितीच्या निमित्ताने रामराजे विरुध्द गोरेंचा संघर्ष

सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) : माण कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर माण तालुक्याचे राजकारण तापले. या निमित्ताने विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक- निंबाळकर आणि भाजपचे आमदार जयकुमार गोरे यांच्यामधील संघर्ष पुन्हा उफाळून आला आहे.

माण कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीच्या अनुषंगाने माण तालुक्यातील अपप्रवृत्ती घालविण्यासाठी सर्वांनी एकत्रित राहणं आवश्यक आहे, असे आवाहन विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी केले.

दहिवडी, ता. माण येथे  ‘आमचं ठरलंय’ टीमच्या सर्वपक्षीय कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना ते संवाद सभेत बोलत होते. यावेळी काँग्रेसचे नेते रणजितसिंह देशमुख, सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक अनिल देसाई, माण-खटाव विधानसभा राष्ट्रवादीचे अध्यक्ष डॉ. संदीप पोळ, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष सुभाष नरळे, राष्ट्रीय काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष एम. के. भोसले, राष्ट्रीय समाज पार्टीचे जिल्हाध्यक्ष मामूशेठ वीरकर, पंचायत समिती सदस्य तानाजी काटकर, सिध्दनाथ पतसंस्थेचे चेअरमन सुनिल पोळ, बबनराव विरकर, विष्णूपंत अवघडे, युवराज सूर्यवंशी, पृथ्वीराज राजेमाने, कविता म्हेत्रे, जालिंदर खरात, बाळासाहेब शिंदे, दादासाहेब दोरगे दादासो मडके, बाबासाहेब माने, पिंटू जगदाळे, रफिक मुलाणी, बाळासाहेब पवार, नानासाहेब शिंदे, दौलतराव जाधव व विविध गावचे सरपंच, सदस्य, सोसायटी सदस्य उपस्थित होते.

यावेळी रामराजेंनी ‘माणमधील वाऱ्याचा अंदाज घ्यायला आलोय, कार्यकर्त्यांना मान खाली घालावी लागेल अशी तडजोड होणार नाही,’ अशी वक्तव्ये केली होती. या पार्श्वभूमीवर आमदार जयकुमार गोरे यांनी सोमवारी पत्रकार परिषद घेऊन समाचार घेतला. 

‘गेल्या पंधरा वर्षांत जंगजंग पछाडूनही तुम्हाला माण-खटावमधील वाऱ्याची दिशा समजली नाही. तुम्ही माणमध्ये आला तेव्हा तुमचा पक्ष आणि बगलबच्चे निवडणुका हरल्याचा इतिहास तुमच्या नावे झाला आहे. तुमचे अतिक्रमण येथील स्वाभिमानी जनतेने नेहमीच हाणून पाडले आहे. पालकमंत्री, विधान परिषदेच्या सभापतिपदाची आयुधे घेऊन आजपर्यंत माणमध्ये आलात. ही राजकीय आयुधे बाजूला ठेवून मैदानात यायचे धाडस दाखवा,’ असे आव्हान आमदार जयकुमार गोरे यांनी दिले. 

error: Content is protected !!