सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) : ‘काँग्रेस, भाजप निवडणुकांबाबत स्वबळाचा नारा देतात. सातारा जिल्ह्यात तर राष्ट्रवादी काँग्रेस सक्षम आणि ताकदवान आहे. त्यामुळे नगरपालिका आणि जिल्हा परिषद निवडणूक पक्ष स्वबळावरच लढवेल,’ अशी स्पष्टोक्ती पुन्हा एकदा आमदार शशिकांत शिंदे यांनी दिली.
सातारा येथे शासकीय विश्रामगृहात आमदार शिंदे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुनील माने, सरचिटणीस राजकुमार पाटील आदी उपस्थित होते. राष्ट्रवादी भटक्या विमुक्त सेल’ची बैठक आज सातारा विश्रामगृह येथे पार पडली. यावेळी सेलच्या माध्यमातून करण्यात येणारी संघटना बांधणी, भटक्या विमुक्त नागरिकांचे प्रश्न याबाबत चर्चा झाली तसेच काही नवीन पदाधिकाऱ्यांना नियुक्ती देण्यात आली. बैठकीस प्रदेशाध्यक्ष श्री.हरिभाऊ राठोड, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष श्री. सुनील माने, सरचिटणीस राजकुमार पाटील, भटक्या विमुक्त सेलचे जिल्हाध्यक्ष प्रा. अशोक जाधव व पदाधिकारी यासह आदी उपस्थित होते
यावेळी आमदार शशिकांत शिंदे यांनी पत्रकारांच्या विविध प्रश्नांना उत्तरे दिली. वाईतील हरीहरेश्वर बँकेबाबतच्या प्रश्नावर आमदार शिंदे म्हणाले, जिल्ह्यातील अनेक बँका अन् पतसंस्था अवसायानात निघत आहेत. तसेच अपहार होत आहेत. अशावेळी सभासद व ठेवीदारांची सुरक्षितता महत्वाची असते. सभासदांना न्याय देण्याची भूमिका असायला हवी.
टोल नाक्याच्या विषयावर शिंदे म्हणाले, ‘ पुणे-बंगळूर महामार्गाचे काम निकृष्ट दर्जाचे झाले आहे. टोलही वाढवला जातोय. ठेकेदारांवर कारवाई केली जात नाही. याबाबत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनाही भेटलो होतो. पण, पुढे काहीच झाले नाही. त्यामुळे सातारकरांनी टोल का द्यायचा ? हाच माझा प्रश्न आहे. त्यासाठी सर्वांनाच पुढे येऊन आंदोलन करावं लागेल. हे आंदोलन पक्षविरहित असावं. जनतेच्या वतीने आंदोलन करण्यासाठी सर्वांनीच एकत्र येण्याची गरज आहे. तरीही कोणी पुढे आले नाही तर योग्यवेळी पुढाकार घेऊ, असेही त्यांनी स्पष्ट केले.
You must be logged in to post a comment.