सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) : जिल्ह्यात करोना बाधित रुग्णांची संख्या वाढत असून लसीकरण मोहिम राबविताना जिल्ह्यात मोठा गोंधळ उडत असल्याचे निदर्शनास येत आहे. योग्य नियोजन, प्रशासकीय यंत्रणा व नागरिकांमधील समन्वय साधून असे प्रकार टाळता येतील. लसीकरण मोहिम योग्यरीत्या राबविण्यासाठी सुसूत्रता आणावी. लसीचा पहिला डोस पूर्ण झालेल्या नागरिकांना दुसऱ्या डोससाठी ताटकळत वाट पहावी लागत आहे. त्यामुळे अशा नागरिकांना प्राधान्य देऊन त्यांच्या वयानुसार वर्गीकरण करून डोस देणे गरजेचे आहे. असे केल्यास लसीकरण केंद्रावर गर्दी होऊन गोंधळ उडण्याचे प्रकार होणार नाहीत. जिल्ह्यातील शेवटच्या नागरिकापर्यंत लस मिळाली पाहिजे. ज्या लसीकरण केंद्रावर पिण्याचे पाणी, शौचालय आदी व्यवस्था आहे अशा लसीकरण केंद्रांनाच मान्यता देण्यात यावी म्हणजे नागरिकांना सोयीचे ठरेल, अशा सूचना खासदार श्रीनिवास पाटील यांनी केल्या.
कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर बुधवारी सातारा येथे जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक पार पडली. यावेळी जिल्हाधिकारी शेखर सिंग, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा, पोलीस अधीक्षक अजयकुमार बंन्सल उपस्थित होते.
श्रीनिवास पाटील म्हणाले, जिल्ह्यात करोना बाधित रुग्णांची संख्या वाढत असून कोरोनाचा लहान मुलांमध्येही प्रादुर्भाव वाढत चालला आहे. ही चिंतेची बाब असून त्यासाठी वेळीच खबरदारी घेणे गरजेचे आहे. संभाव्य धोका लक्षात घेता जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील हॉस्पिटलमध्ये लहान मुलांसाठीचे स्वतंत्र वार्ड आत्तापासूनच तयार केले गेले पाहिजेत. लहान मुलांच्या विशेष गरजा असल्याने त्या अनुशंगाने खासबाब म्हणून तशी तात्काळ कार्यवाही करण्यात यावी. करोनाच्या या भीषण काळात दुर्दैवाने जी मुले आई-वडिलांच्या निधनानंतर अनाथ झाली आहेत. अशा अनाथ मुलांची व्यवस्था करणे गरजेचे तर आहेच तसेच ते आपले कर्तव्य देखील आहे. त्यामुळे त्यांच्या देखभालीसाठी जिल्हाधिकाऱ्यांनी सदर अनाथ मुलांची व्यवस्था एखाद्या स्वयंसेवी संस्थेमध्ये करावी जेणेकरून यांचे संगोपन ही उत्तम होईल.
रेमडेसिवीर इंजेक्शनचा काळाबाजार होत असल्याच्या घटना वारंवार घडत आहेत. त्याला आळा घालण्यासाठी इंजेक्शन वापरल्यानंतर त्या बाटल्या फोडून टाकण्यात याव्यात. जेणेकरून त्या बाटल्यांचा दुरुपयोग होऊन त्या बाटल्यांमध्ये अन्य काही पदार्थ भरून त्या विकल्या जाऊ नयेत. यासाठी ज्यांना ज्यांना रेमडेसिवीर इंजेक्शन पुरवठा केला जात आहे, त्या सर्व रुग्णालयांना त्याचा वापर जबाबदारीने व काळजीपूर्वक करण्याच्या सक्त सूचना द्याव्यात. कोविड सेंटर आणि जम्बो कोविड सेंटर या ठिकाणी ऑक्सीजनचा वापर काळजीपूर्वक होणे आवश्यक आहे. गरजू रूग्णांना ऑक्सिजनचा पुरवठा होण्यासाठी ऑक्सिजनचा अपव्यय होऊ नये यासाठी काटेकोर नियोजन केले पाहिजे. त्यावर लक्ष ठेवण्यासाठी दहा बेड मागे एका नर्स किंवा वॉर्डबॉयची नियुक्ती करण्यात यावी. त्यामुळे ऑक्सिजनची बचत होऊन अत्यावश्यक रूग्णांना ऑक्सिजनचा तुटवडा भासणार नाही व त्यांना मुबलक प्रमाणात ऑक्सिजन पुरवठा करणे शक्य होईल. याशिवाय तालुक्यातील प्रत्येक ठिकाणी इमर्जन्सी ऑक्सिजन सिलेंडर एखाद्या गाडीत ठेवावा. त्याचा संपर्क नंबर तालुक्यातील सर्वांना कळेल अशी व्यवस्था करावी. जेणेकरून अत्यंत गरजेच्या वेळी रूग्णापर्यंत ऑक्सिजन पोहचला जावून उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये दाखल करेपर्यंत त्यास ऑक्सिजन उपलब्ध होईल व कोणतीही जीवीत हानी होणार नाही.
You must be logged in to post a comment.