सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) : मागील काही दिवसांपासून सातारा जिल्ह्यातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यातही सातारा, कराड, फलटण, वडूज आदी शहरामध्ये कोरोना बाधित रुग्णांची संख्या लक्षणीय आहे. शासनाने लॉकडाऊन आणि संचारबंदी जाहीर केली आहे. तरीही अनेक जण बेफिकरीने घऱाच्या बाहेर पडत असून बाहेर गर्दी करीत आहेत. अशा लोकांना अटकाव करण्यासाठी कराड नगरपालिकेने बाहेर फिरणाऱ्यांची थेट कोरोना चाचणी घेण्यास सुरुवात केली आहे. कोल्हापूर नाक्यावर वाहने अडवून पोलिसांच्या सहकार्याने ही चाचणी करण्यात येत आहे.
सातारा जिल्ह्यात कोरोना बाधितांचा आकडा झपाट्याने वाढत आहेत. कऱ्हाड शहरासह तालुक्यात कोरोना संसर्गाचा फैलाव वाढला आहे. मात्र, तरीही अनेकजण नियमाचे उल्लंघन करून संसर्गाला निमंत्रण देत आहेत. कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर १५ एप्रिलपासून कडक निर्बंध लावले आहेत. अत्यावश्यक सेवा वगळता अन्य बाबींवर निर्बंध आहेत. संचारबंदी काळात विनाकारण रस्त्यावर फिरण्यास मनाई करण्यात आली आहे. तरीही काही दूचाकीस्वार नाहक रस्त्यावरून फिरताना दिसत असल्याने पोलिसांनी प्रारंभी दूचाकी जप्त करण्यास सूरूवात केली. मात्र, तरीही काहीजण विनाकारण फिरताना दिसत असल्याने पालिकेचे मुख्याधिकारी रमाकांत डाके यांनी विनाकारण फिरणाऱ्यांची कोरोना चाचणी करण्याची सूचना केली आहे. नागरी आरोग्य केंद्राच्या लॅब टेक्निशियन अनिता पवार, पालिका कर्मचारी पंकज काटरे, शुभम कांबळे, प्रणयजीत कांबळे, सुरज थोरात, प्रसाद जाधव, प्रसाद कांबळे, तुषार सोरटे, सोहेब मूल्ला, सुजीत साळूंखे, ओमकार भोकरे ही टीम कोल्हापूर नाक्यावरील नाकाबंदी केंद्रावर कोरोना चाचणीसाठी कार्यरत आहेत.रस्त्यावरील वाहने अडवून विनाकारण कोणी फिरताना आढळल्यास पोलीस संबंधिताला कोरोना चाचणी केंद्रात घेऊन जात आहेत. त्याठिकाणी संबंधिताची चाचणी करण्यात येत असून मंगळवारी पहिल्याच दिवशी अनेकांची याठिकाणी चाचणी करण्यात आली.
You must be logged in to post a comment.