सातारा जिल्हा परिषद अव्वल !

पंडित दिनदयाळ उपाध्याय पुरस्कारावर कोरले नाव; तीन ग्रामपंचायतीही झळकल्या

सातारा (भूमिशिल्प वृत्तसेवा) : केंद्र शासनाने ठरवलेल्या धोरणानुसार विविध शासकीय योजना राबविण्यात अग्रेसर राहून विविध विभागनिहाय स्तरावर उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल सातारा जिल्हा परिषदेने राज्यात प्रथम क्रमांक पटकावत यंदाचा पंडित दिनदयाळ उपाध्याय पंचायत सशक्तीकरण पुरस्कार पटकावल्याची माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय भागवत यांनी पत्रकार परिषदेत बोलताना दिली. 

पत्रकार परिषदेस जिल्हा परिषदेचे अध्यक्ष उदय कबूले, उपाध्यक्ष प्रदीप विधाते, शिक्षण सभापती मानसिंगराव जगदाळे, कृषी व पशूसंर्वधन सभापती मंगेश धुमाळ, महिला व बालकल्याण सभापती सोनाली पोळ, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये उपस्थित होते. संजय भागवत यांनी दिलेल्या अधिक माहितीनुसार, केंद्र शासनाने ग्रामपंचायत, पंचायत व जिल्हा परिषद या तिन्ही स्तरावर देशातील सर्व पंचायत राज संस्थांसाठी 2015 -16 पासून पंचायत राज सशक्तीकरण पुरस्कार, राष्ट्रीय ग्रामगौरव पुरस्कार व मनरेगा पुरस्कारासाठी स्पर्धेचे आयोजन करण्यास सुरुवात केली. यासाठी पंचायत राजच्या तिन्ही स्तरावर 100 गुणांची प्रश्नावली तयार केली. त्यानुसार ही ऑनलाइन प्रश्नावली भरून केंद्र शासनास नामांकने सादर केली जातात.
या पुरस्कारांसाठी जिल्हा परिषद व पंचायत समितीमधील कामकाज, सदस्यांची उपस्थिती व त्यांनी उपस्थित केलेले प्रश्न, जिल्हा वार्षिक योजनेचे नियोजन, मिळणार्‍या निधीचा विनियोग, नैसर्गिक साधन संपत्तीचे व्यवस्थापन, ई-गव्हर्नन्स आदी स्तरावरील कामगिरीचे मूल्यमापन केले जाते. या सर्व स्तरावर उल्लेखनीय कामगिरी बजावत सातारा जिल्हा परिषदेने राज्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे.
एकात्मिक बालविकास सेवा योजनेकडून अंगणवाडीकडील मुलांना पोषण आहारांतर्गत उइए साठी चांगल्या प्रकारे केलेले काम तसेच पशुसंवर्धन विभागाअंतर्गत जनावरांना औषधोपचार, लसीकरण, कृत्रिम रेतन, जन्मलेली वासरे, वांझ तपासणी, एकदिवसीय कोंबडी पिल्ले वाटप आणि नमुने तपासणी हे तांत्रिक कामकाज चांगल्या प्रकारे केल्याबद्दल सातारा जिल्हा परिषदेने राज्यात पहिला क्रमांक मिळवला असल्याचे भागवत यांनी सांगितले.
खटाव, इजबाव, ओझर्डे ग्रामपंचायतींचे देशपातळीवर यश
ग्रामपंचायत स्तरावर शासकीय ध्येयधोरणानुसार, चांगले कामकाज केल्याबद्दल खटाव तालुक्यातील खटाव ग्रामपंचायतीने राज्यात 8 वा तर माण तालुक्याने राज्यात 14 वा क्रमांक पटकावला. वाई तालुक्यातील ओझर्डे या ग्रामपंचायतीने नानाजी देशमुख राष्ट्रीय गौरव ग्रामसभा पुरस्कार योजनेत देश पातळीवर उत्कृष्ट ग्रामपंचायतींच्या यादीत स्थान पटकावले. या ग्रामपंचायतींना प्रत्येकी 8 लाख रुपये इतकी पुरस्काराची रक्कम मिळणार आहे. ग्रामपंचायतींनी मिळविलेल्या यशामुळे सातारा जिल्ह्याचा नावलौकिक राज्यात तसेच देशपातळीवर झाला आहे.











error: Content is protected !!