सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) : शाहूपुरी येथील ऐतिहासिक फाशीचा वड म्हणजेच स्वातंत्र्यसंग्राम स्मृती मंदिर, याचे सुशोभीकरण व्हावे, तसेच हे स्थळ पर्यटनस्थळ म्हणून विकसित व्हावे यासाठी आ. श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचा पाठपुरावा सुरु होता. त्याला यश मिळाले असून आ.शिवेंद्रसिंहराजेंच्या पाठपुराव्यातून फाशीचा वड स्मृती मंदिर सुशोभीकरणासाठी राज्याच्या पर्यटन विभागाकडून १० लाख रुपये निधी मंजूर करण्यात आला आहे. निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी पर्यटनमंत्री ना. मंगलप्रभात लोढा यांचे आभार मानले आहेत.
पर्यटन विभाग, महाराष्ट्र शासनाने “महाराष्ट्र पर्यटन धोरण” यामध्ये धार्मिक पर्यटन धोरणाला महत्व दिले आहे. सदरच्या धार्मिक पर्यटन धोरणाचे प्रमुख उद्दिष्ट म्हणजे धार्मिक स्थळांचे पावित्र्य, स्वच्छता व मूलभूत सोयीसुविधा निर्माण करून पर्यटनास चालना मिळवून देणे होय. शहरी तसेच ग्रामीण भागातील मंदिरांमध्ये भाविक नियमितपणे भेट देत असतात. अशावेळी मंदिरांच्या ठिकाणी असणा-या सोयीसुविधांच्या अभावामुळे नागरिकांना अडचणी निर्माण होतात. अशा सोयीसुविधा मंदिरांच्या ठिकाणी निर्माण करून स्थानिक धार्मिक पर्यटनास चालना देण्याचा पर्यटन विभागाचा प्रयत्न आहे. त्यानुसार आ. शिवेंद्रसिंहराजेंच्या मागणीवरून प्रादेशिक पर्यटन योजनेअंतर्गत फाशीचा वड स्मृती मंदिर सुशोभीकरणासाठी १० लाख रुपये मंजूर करण्यात आलेले आहेत.
मंजूर निधीमधून फाशीचा वड स्मृती मंदिराकरिता दर्जेदार व गुणवत्तापूर्ण सुविधा निर्माण करुन सातारा शहराच्या, शाहूपुरीच्या नावलौकिकामध्ये भर पडेल, अशी अपेक्षा आ. शिवेंद्रसिंहराजेंनी यानिमित्ताने व्यक्त केली आहे. निविदा प्रक्रिया व इतर शासकीय सोपस्कार तातडीने पूर्ण करून फाशीचा वड स्मृती मंदिर सुशोभीकरणास प्रारंभ करा आणि काम दर्जेदार करून वेळेत पूर्ण करा, अशा सूचना आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना केल्या आहेत.
You must be logged in to post a comment.