अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी एकाला दहा वर्षे सक्तमजुरी

सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) : लग्नाचे आमिष दाखवून जावळी तालुक्यातील एका अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी एकाला विशेष जिल्हा व सत्र न्यायाधीश ए. के. पटणी यांनी दहा वर्षे सक्तमजुरीची शिक्षा ठोठावली आहे.

संदीप तानाजी देशमुख (वय ३९, रा. सोनगाव, ता. जावळी) असे त्याचे नाव आहे. संबंधित मुलीला लग्नाचे आमिष दाखवून त्याने शरीरसंबंध ठेवले होते. त्यातून ती गर्भवती राहून मुलगा झाला. त्यानंतर त्याने मुलगा माझा नाही, तू कोणाला सांगितलेस तर जिवे मारीन, अशी धमकी दिली. याबाबत पीडित मुलीच्या फिर्यादीवरून मेढा पोलिस ठाण्यात संदीपवर गुन्हा दाखल झाला होता. तत्कालीन उपअधीक्षक यशवंत काळे यांनी तपास करून जिल्हा न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले होते. खटल्या दरम्यान ११ साक्षी तपासण्यात आल्या.

साक्षीदारांच्या साक्षी व सहायक सरकारी वकील नितीन मुके यांचा युक्तिवाद ग्राह्य मानून न्यायाधीश पटणी यांनी संदीपला दहा वर्षे सक्तमजुरी, दहा हजार रुपये दंड व दंड न दिल्यास सहा महिने साध्या कैदेची शिक्षा ठोठावली. सरकारी वकिलांना पैरवी अधिकारी एस. एस. राजेभोसले, पोलिस प्रॉसिक्यूशन स्कॉडचे उपनिरीक्षक राजेंद्र यादव, शिवाजीराव घोरपडे, सहायक फौजदार ऊर्मिला घारगे, हवालदार शमशुद्दीन शेख, गजानन फरांदे, रेहाना शेख, राजेंद्र कुंभार व अमित भरते यांनी सहकार्य केले.

error: Content is protected !!