सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) : वनरक्षक, वनपाल, आरोग्य विभागमध्ये क्लार्क या पदावर नोकरीला लावतो, असे सांगून पाच तरूणांची तब्बल ११ लाखांची फसवणूक केल्याचे समोर आले असून, याप्रकरणी सातारा शहर पोलीस ठाण्यात एका तरूणावर गुन्हा दाखल झाला आहे.
राजेश नंदकुमार शिंदे (वय ३२, रा. बोरगाव, ता. सातारा) याच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, राजेश शिंदे याने गणेश कृष्णा चव्हाण (वय २९, रा. स्वरूप काॅलनी, सदर बझार सातारा), निखिल श्रीरंग निकम (सदर बझार सातारा), सचिन दगडू कदम (रा. घाटकोपर, मुंबर्इ), सागर संतोष उत्तेकर (रा. कांदीवली मुंबइ), किरण प्रकाश शिंदे (रा. गडकर आळी, सातारा) या तरूणांकडून तब्बल ११ लाख घेतले. हे पैसे तरूणांनी फोन पे वर त्याला पाठविले.
कोणाला वनपाल तर कोणाला क्लार्कची शासकीय नोकरी लावण्याचे आमिष त्याने दाखविले. पैसे घेतल्यानंतर त्याने मंत्रालयात जायचे आहे. थाेड्या दिवस थांबा असे, सांगितले. त्यामुळे हे सर्व तरूण नोकरीची वाट पाहात होते. परंतु त्याला पैसे देऊन दीड वर्षे झाले. मात्र, त्याने कोणालाही नोकरी लावली नाही. त्यामुळे आपली फसवणूक झाल्याचे निदर्शनास येताच संबंधित तरूणांनी सातारा शहर पोलीस ठाण्यात धाव घेऊन राजेश शिंदे याच्याविरोधात तक्रार दाखल केली आहे.