युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत प्रतापगडसह शिवरायांचे १२ किल्ले; शिवतीर्थावर शिवप्रेमींचा जल्लोष

सातारा,(भूमिशिल्प वृत्तसेवा): छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्याचा आणि स्वराज्याच्या प्रेरणादायी इतिहासाचा साक्षीदार ठरलेले बारा किल्ले युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीत समाविष्ट झाले असून, त्यात सातारा जिल्ह्याचा अभिमान असलेला प्रतापगड किल्लाही जगाच्या नकाशावर ठळकपणे कोरला गेला आहे. हा ऐतिहासिक क्षण सातारकरांसाठी अभिमानाचा ठरला असून, त्यानिमित्त पोवई नाका येथील शिवतीर्थावर शिवभक्त आणि शिवप्रेमींनी मोठ्या जल्लोषात आनंद व्यक्त केला. “छत्रपती शिवाजी महाराज की जय”च्या घोषणांनी आसमंत दुमदुमून गेला. वीरश्रीने भारलेल्या पोवाड्यांनी आणि भगव्या पताकांनी सजलेल्या शिवतीर्थावर लेझीम आणि साहसी खेळ सादर होत असताना प्रत्येक शिवप्रेमीच्या चेहऱ्यावर आनंद झळकत होता.

शिवतीर्थावर झालेल्या अभिवादन सोहळ्यात पालकमंत्री शंभूराज देसाई, सार्वजनिक बांधकाम मंत्री श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले, आमदार मनोज घोरपडे, जिल्हाधिकारी संतोष पाटील, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, पोलीस अधीक्षक तुषार जोशी यांच्यासह असंख्य शिवभक्त सहभागी झाले होते. सर्वांनी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
पालकमंत्री शंभूराज देसाई म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराजांचे बारा किल्ले जागतिक वारसा स्थळांच्या यादीत समाविष्ट होण्यासाठी गेल्या दोन वर्षांपासून राज्य सरकार व केंद्र सरकारकडून सातत्याने पाठपुरावा सुरू होता. सांस्कृतिक कार्य विभागासह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार यांनी यासाठी राजनैतिक पातळीवर प्रयत्न केले. परदेशातही याबाबत अनेक बैठका झाल्या आणि अखेर या ऐतिहासिक प्रयत्नांना यश मिळाले. प्रतापगड आता जगाच्या नकाशावर शिवरायांच्या शौर्याचे प्रतीक म्हणून अधोरेखित झाला आहे आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर पर्यटकांसाठी आकर्षण ठरणार आहे. पर्यटनाला चालना देण्यासाठी रायगड, प्रतापगड, सिंहगड, शिवनेरी, अजिंक्यतारा, पन्हाळा यांना जोडणारे फोर्ट सर्किट विकसित केले जाणार असून गडांचे पावित्र्य राखणे आपले कर्तव्य आहे, असेही ते म्हणाले.
छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले म्हणाले की, या ऐतिहासिक यशामुळे महाराजांच्या किल्ल्यांचा इतिहास जगभर पोहोचेल. इतिहास प्रेमी व पर्यटक अभ्यासासाठी गडकिल्ल्यांना भेट देतील. पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि सांस्कृतिक कार्य विभागाच्या प्रयत्नांना याचे श्रेय जाते. आज शिवतीर्थावर आपण सर्वजण शिवरायांच्या कार्यकर्तृत्वाला मानवंदना देण्यासाठी एकत्र आलो आहोत आणि हा क्षण प्रत्येक शिवभक्तासाठी अभिमानाचा आहे.
युनेस्कोच्या यादीत प्रतापगडाचा समावेश झाल्यानंतर जिल्ह्यातील प्रत्येक शाळेत परिपाठाच्या वेळी या ऐतिहासिक क्षणाचे चित्रीकरण विद्यार्थ्यांना दाखवून आनंद साजरा करण्यात आला. मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराज यांच्या संकल्पनेतून जिल्ह्यातील प्राथमिक व माध्यमिक शाळांमध्ये उत्सवाचे आयोजन झाले.
विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या व्हिडिओंचे जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी विशेष कौतुक केले.शिवरायांच्या किल्ल्यांचा जागतिक नकाशावर डंका वाजल्याने सातारा जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रासाठी हा अभिमानाचा दिवस ठरला आहे.

You must be logged in to post a comment.