वाढे फाटा ते पोवई नाका रस्त्याच्या चौपदरीकरणासाठी १४ कोटी ७२ लाखांचा निधी ; आ. शिवेंद्रसिंहराजेंच्या पाठपुराव्याला यश

सातारा,(भूमिशिल्प वृत्तसेवा) : सातारा लोणंद या रस्त्यावरील वाढे फाटा ते पोवई नाका या ३.४० किलोमीटर रस्त्याचे भाग्य आ. श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या पाठपुराव्यामुळे उजळणार आहे. आ. शिवेंद्रराजे यांच्या मागणीनुसार केंद्रीय रस्ते वाहतूक आणि परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी वाढे फाटा ते पोवई नाका या रस्त्याचे चौपदरीकरण करण्यासाठी तब्बल १४ कोटी ७२ लाख ३७ हजार रुपयांचा निधी मंजूर केला आहे. 

राज्य मार्ग ११७ असलेल्या शिक्रापूर, जेजुरी, लोणंद, सातारा या मार्गावरील सातारा शहराचे मुख्य प्रवेशद्वार असलेल्या वाढे फाटा ते पोवई नाका या ३.४० किलोमीटर अंतराच्या रस्त्यावर नेहमीच वाहनांची मोठी वर्दळ असते. वाहतूक कोंडी टाळण्यासाठी आणि वाहतूक सुरळीत आणि सुरक्षित होण्यासाठी या दुहेरी रस्त्याचे चौपदरीकरण व्हावे, याबाबत आ. शिवेंद्रराजे यांचा ना. गडकरी यांच्याकडे पाठपुरावा सुरु होता. शिवेंद्रसिराजे यांच्या मागणीनुसार वाढे फाटा ते पोवई नाका या रस्त्याच्या चौपदरीकरणासाठी  ना. गडकरी यांनी त्यांच्या खात्यातून भरीव निधी मंजूर केला आहे. 


मंजूर निधीतून वाढे फाटा ते पोवई नाका या रस्त्याच्या चौपदरीकरणासह रस्त्याच्या कडेला आरसीसी गटर बांधणे, या रस्त्यावर असलेल्या पुलांची सुधारणा करणे, रस्त्याच्या मध्ये  दुभाजक आदी कामाचा अंतर्भाव करण्यात आला आहे. हे काम सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत केलं जाणार असून येत्या काही दिवसांत निविदा प्रक्रिया व इतर शासकीय सोपस्कार पूर्ण होऊन प्रत्यक्ष काम सुरु केले जाणार आहे. दुहेरी असलेल्या या प्रमुख रस्त्याचे चौपदरीकरण झाल्यानंतर दळणवळणासाठी हा रास्ता अधिक सोयीस्कर आणि सुरक्षित होणार आहे.

error: Content is protected !!