सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) : सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागात चार दिवसांपासून दमदार पाऊस कोसळत आहे. पण, बुधवारपासून पावसाने रौद्ररूप धारण केले आहे. कोयना, नवजा, कास, बामणोली, तापोळा, महाबळेश्वर या भागात पडत मुसळधार आहे. यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. तापोळा पासून शिवसागर जलाशयाच्या एका टोकावर असणाऱ्या खरोशी खोऱ्यात महाबळेश्वर ते अहिर , शिंदी , लामज या गावांना जोडणारा जुना दगडी पूल चतुर बेट येथे आहे. या पुलावरून पाणी वाहत असल्याने या परिसरातील अनेक गावे संपर्क हीन झाली आहेत.
जिल्ह्याच्या पश्चिम भागात बुधवारपासून धो-धो पाऊस कोसळत असल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. अनेक मार्गावरील वाहतूक विस्कळीत होण्याबरोबर काही ठिकाणची बंद झाली. तर कोयना धरण साठ्यात २४ तासांत साडे नऊ टीएमसीने वाढ झाली. गुरूवारी सकाळच्या सुमारास धरणात ६६.७५ टीएमसी साठा झाला होता. गेल्या काही वर्षांतील हा उच्चांक ठरला आहे. दरम्यान, प्रमुख अनेक धरणांतून विसर्ग सुरू करण्यात आला आहे.
लोकांना घराबाहेर पडणेही मुश्किल झाले आहे. ओढे, ओघळ भरुन वाहत आहेत. अनेक मार्गावर पाणी आल्याने वाहतूक मंदावली. तसेच काही रस्त्यावर दगड व पाणी आल्याने वाहतूक बंद झाली आहे. तर मेढा-महाबळेश्वर मार्गावर केळघरजवळ रस्ता वाहून गेला. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक बंद झाली आहे.
You must be logged in to post a comment.