सायबर फसवणुकीतील ₹३३,५०० तक्रारदारास परत

रहिमतपूर पोलिसांची तत्पर कारवाई; सायबर तपासातून यशस्वी वसुली

सातारा,(भूमिशिल्प वृत्तसेवा):कोरेगाव तालुक्यातील रहिमतपूर येथील मयूर मोहन शेडगे (वय ३०) या तरुणाची टेलिग्राम चॅनेलच्या माध्यमातून ३३ हजार ५०० रुपयांची फसवणूक झाली होती. अज्ञात व्यक्तीने ऑनलाईन काम देतो असे सांगून त्यांच्याकडून हेरगिरीने पैसे उकळले. मात्र रहिमतपूर पोलिसांच्या सायबर सेलने योग्य वेळी हस्तक्षेप करून ही संपूर्ण रक्कम तक्रारदारास परत मिळवून देण्यात यश मिळवले.

१७ जानेवारी २०२५ रोजी मयूर शेडगे यांनी रहिमतपूर पोलीस ठाण्याच्या सायबर विभागाकडे फसवणुकीची तक्रार दाखल केली होती. तक्रारीनुसार, टेलिग्रामवरील एका चॅनेलवरून ‘वर्क फ्रॉम होम’ स्वरूपाचा नोकरीसंबंधीचा प्रस्ताव देण्यात आला. अज्ञात व्यक्तीने सुरुवातीला काही सोपे टास्क दिले आणि त्यावर काही रक्कम व व्याजही शेडगे यांना परत पाठवले. यामुळे त्यांचा विश्वास बसला. पुढच्या टप्प्यात मोठ्या टास्कच्या बहाण्याने एकूण ₹३३,५०० त्यांच्या खात्यातून वर्ग करवून घेतले. मात्र त्यानंतर कोणताही प्रतिसाद न आल्याने शेडगे यांना आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले.

या तक्रारीवर सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन कांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली सायबर विभागाने तात्काळ तपास सुरू केला. या प्रकरणात आणखी एक तक्रार प्राप्त झाल्याने अधिक गांभीर्याने तपास करण्यात आला. पोलिसांनी फिर्यादीचे बँक खाते त्वरित गोठवले आणि संबंधित खात्यांवरील व्यवहार थांबवले. न्यायालयाचे आदेश घेऊन अखेर सायबर सेलने फसवणूक झालेली रक्कम पुन्हा तक्रारदाराच्या खात्यात वर्ग करून दिली.

या यशस्वी तपासाबद्दल पोलीस अधीक्षक तुषार दोशी आणि अपर पोलीस अधीक्षक वैशाली कडूकर यांनी रहिमतपूर पोलिसांचे कौतुक केले आहे. तपास प्रक्रियेत सायबर विभागाचे दीपक देशमुख यांनी मोलाचे योगदान दिले.

दरम्यान, पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, ऑनलाइन व्यवहार करताना सावधगिरी बाळगावी. कोणतीही शंका आल्यास अथवा फसवणूक झाल्यास ‘१९३०’ या राष्ट्रीय हेल्पलाईन क्रमांकावर तत्काळ तक्रार नोंदवावी, जेणेकरून वेळेवर कारवाई करता येईल.

error: Content is protected !!