दरोड्याचा गुन्हा ४८ तासांच्या आत उघड

सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) : शेंद्रे ता. सातारा येथे दि. ८ रोजी मध्यरात्री एका पिकअप चालकाला पाच जणांनी अडवून मोबाईल व रोकड लंपास केली होती. याचा सातारा तालुका पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्यावतीने 48 तासात या गुन्ह्याचा उलगडा करून पाच दरोडेखोरांना जेरबंद करण्यात आले आहे.

दि. ८ नोव्हेंबर २०२१ रोजी रात्री ०३.३० वा. चे सुमारास मौजे शेंद्रे, ता.जि.सातारा गावचे हद्दीतील राष्ट्रीय महामार्गावरील पुलाचे खाली ३ वेगवेगळया मोटार सायकलवरुन आलेल्या अनोळखी इसमांनी फिर्यादी यांची पिकअप व्हॅन थांबवून “ तु सोनगाव रोडला माणसाला धडक देवून आला आहेस” असे म्हणून त्याची गाडी थांबवुन त्यापैकी एका इसमाने फिर्यादी यांच्या डोळ्यात चटणी टाकून फिर्यादीच्या खिशातील मोबाईल हॅन्डसेट काढून घेतला, दुसऱ्या अनोळखीइसमाने गाडीतील क्लिनरच्या डोळयात चटणी टाकून पिकअप गाडीच्या ड्रावरमध्ये ठेवलेली ५२,६८० रुपयाची रोख रक्‍कम जबरदस्तीने काढुन घेतलेबाबत विनायक विजय हाके, वय ३० वर्षे,
रा.मु.पो.बोरगाव, ता.वाळवा, जि.सांगली यांनी दिले फिर्यादीवरुन सातारा तालूका पोलीस ठान्यात गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे.

नमुद गुन्हयाचे गांभीर्य लक्षात घेवून गुन्हयाचे घटनास्थळी अजय कुमार बंसल पोलीस अधीक्षक सातारा, अजित बोऱ्हाडे अपर पोलीस अधीक्षक सातारा, आंचल दलाल, सहायक पोलीस अधीक्षक सातारा यांनी भेट देवुन सदरचा गुन्हा उघडकीस आणण्याबाबत स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक .किशोर धुमाळ व सहायक पोलीस निरीक्षक रमेश गर्जे यांना सुचना दिल्या. त्याप्रमाणे सदर गुन्हा उघड करणेकामी स्थानिक गुन्हे शाखेचे विशेष पथक नेमण्यात आले होते.

सहायक पोलीस निरीक्षक रमेश गर्जे, पोलीस उपनिरीक्षक गणेश वाघ, पोलीस उप-निरीक्षक मदन फाळके तसेच स्थानिक गुन्हे शाखेकडील पोलीस अंमलदार यांच्या तपास पथकाने सर्वप्रथम गुन्हयाचे घटनास्थळी भेट देवून घटनास्थळाची पाहणी केली. गुन्हयातील फिर्यादी तसेच त्याचेसोबत घटनेवेळी हजर असेलेला गाडीवरील क्लिनर, गुन्हयातील इतर साक्षीदार यांच्याकडे गुन्हयाचे अनुशंगाने विचारपुस केली असता तपास पथकास एक महत्वपुर्ण माहिती प्राप्त झाली. त्या माहितीच्या अनुषंगाने घटनास्थळाचे आजुबाजुचे तसेच सातारा शहरातील सी.सी.टी.वही. फुटेजेस तपासुन व गोपनिय बातमीदारामार्फत
खातरजमा केली असता सदरचा गुन्हा हा सातारा शहरातील एका संशयीताने त्याचे जामखेड जि. अहमदनगर, तसेच बीड येथील साथीदारांसह केला असुन सदर संशयीत सध्या त्याचे मुळ गावी, भुम जि. उस्मानाबाद येथे असल्याबात माहिती प्राप्त झाली. त्याप्रमाणे तपास पथकाने भुम जि.उस्मानाबाद, जामखेड जि. अहमदनगर तसेच बीड येथुन गुन्हयातील एकुण ५ संशयीत आरोपींना ताब्यात घेवून स्थानिक गुन्हे शाखा, सातारा येथे आणुन त्यांचेकडे गुन्हयाचे अनुशंगाने विारपुस केली असता त्यांनी सदरचा गुन्हा केला असल्याचे सांगीतल्याने त्यांना पुढील कार्यवाही कामी सातारा तालूका पोलीस ठाण्याचे ताब्यात देण्यात आले आहे.

error: Content is protected !!