सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) – सातारा जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढू लागल्याने प्रशासन सतर्क झाला आहे. दरम्यान, राजवाडा चौपाटी येथील व्यावसायिकांनी खासदार उदनयराजे भोसले यांच्याकडे चौपाटी सुरु करण्याची मागणी केली. त्यास त्यांनी परवानगी दिली. मात्र, सातारा पालिकेच्यावतीने सुरू असलेल्या तपासणीमध्ये चौपाटीसह व्यापारी पेठांमधील तब्बल ७० व्यापारी पाॅझिटिव्ह सापडल्याने शहरात खळबळ उडाली आहे.
कोरोनाचे संक्रमण नियंत्रणात आणण्यासाठी सातारा पालिकेकडून शहरातील व्यापारी, विक्रेते व दुकानदारांना आरटीपीसीआर चाचणी बंधनकारक करण्यात आली आहे. गेल्या दहा दिवसात दीड हजाराहून अधिक व्यापाऱ्यांची आरटीपीसीआर चाचणी करण्यात आली. यामध्ये राजवाडा चौपाटीवरील चार हातगाडीधारकांसह जवळपास ७० व्यापाऱ्यांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याने शहरात खळबळ उडाली आहे.सुरक्षिततेच्या कारणास्तव पालिका मुख्याधिकार्यांकडून राजवाडा चौपाटी शनिवारपासून बंद ठेवण्यात आली आणि दुसरीकडे खणआळीत कोरोनाने शिरकाव केला. येथील एका प्रसिद्ध शू मार्टमधील सात कर्मचार्यांना कोरोनाची लागण झाल्याचा अहवाल पालिकेला शनिवारी प्राप्त झाला. त्यानंतर पालिकेच्या आरोग्य व कोरोना विभागाची धावाधाव सुरू झाली.
कोरोना पथकाकडून बाधित कर्मचाऱ्यांची माहिती घेऊन त्यांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींच्या नोंदी घेण्याचे काम रात्री उशीरा हाती घेण्यात आले. दरम्यान, व्यापारी पेठेत प्रथमच आणि एकाच वेळी सात कर्मचारी कोरोना बाधित आढळल्याने खळबळ उडाली आहे. सातारा शहराचा आठवडा बाजार रविवारी भरत असतो. या बाजाराला शहरी व ग्रामीण भागातील शेतकरी, ग्रामस्थ मोठ्या संख्येने हजेरी लावत असतात. बाजारात विक्रेत्यांकडून कोणत्याही नियमांचे पालन केले जात नाही. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने आठवडा बाजाराबाबत तातडीने निर्णय घेणे गरजेचे आहे.
You must be logged in to post a comment.