सातारा ,(भूमिशिल्प वृत्तसेवा): मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस. एम. देशमुख व किरण नाईक यांच्या नेतृत्त्वाखाली पत्रकारांची राज्यात ताकद निर्माण झाली आहे. सातारा जिल्ह्यातील पत्रकार मतभेद बाजूला ठेवून आमच्या अधिस्वीकृती समितीवरील निवडीनंतर एका झेंड्याखाली एकत्र आले हा गौरवाचा क्षण आहे. मी ज्या वृत्तपत्राचा घटक आहे तिथे व पत्रकार संघाचा जिल्हा अध्यक्ष आहे तिथे माझी कारकीर्द वांझोटी गेली नाही. आता अधिस्वीकृती समितीवरील कारकिर्दही वांझोटी जाणार नाही. सातार्याला अभिमान वाटेल अशीच आपली कारकिर्द असेल, अशी ग्वाही महाराष्ट्र शासनाच्या पुणे विभागीय अधिस्वीकृती समितीचे नवनिर्वाचित सदस्य व सातारा जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष हरीष पाटणे यांनी दिली.
राज्य शासनाच्या पुणे विभागीय अधिस्वीकृती समिती सदस्यपदी निवड झाल्याबद्दल सातारा जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष हरीष पाटणे आणि सातारा पत्रकार संघाचे सदस्य चंद्रसेन जाधव यांचा शासकीय विश्रामगृहावर सत्कार करण्यात आला. यावेळी ज्येष्ठ पत्रकार जीवनधर चव्हाण, मराठी पत्रकार परिषदेचे राज्य उपाध्यक्ष शरद काटकर, सातारा पत्रकार संघाचे अध्यक्ष विनोद कुलकर्णी, जिल्हा पत्रकार संघाचे प्रसिद्धी प्रमुख दिपक शिंदे, परिषदेचे प्रतिनिधी सुजित आंबेकर, जिल्हा पत्रकार संघाचे उपाध्यक्ष दत्ता मर्ढेकर, ज्येष्ठ पत्रकार तुषार भद्रे, श्रीकांत कात्रे, गजानन चेणगे, इलेक्ट्रॉनिक मीडिया असोसिएशनचे अध्यक्ष ओंकार कदम, डिजीटल मीडिया परिषदेचे अध्यक्ष सनी शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती.
जीवनधर चव्हाण म्हणाले, हरीष पाटणे यांचा पत्रकारितेतील संघर्ष मी जवळून पाहिला आहे. वृत्तपत्राची जबाबदारी सांभाळताना संघटना व सामान्य लोकांसाठीची त्यांची तळमळ आणि संवेदना पाहिल्यानंतर वाटते हरीष पाटणे होणे सोपे नाही. ‘संघर्षा तुझेच नाव हरीष पाटणे’, असाच त्यांच्या कर्तृत्वाचा उल्लेख करावा लागेल. हरीष पाटणे यांना अनेकांनी अडवण्याचे काम केले पण यावर मात करत त्यांनी वाटचाल केली. हरीष पाटणे व विनोद कुलकर्णी या दोघांनी मिळून पत्रकार संघटनेत शिस्त आणली. आधी सातारा शहर पत्रकार संघ आणि नंतर एस.एम. देशमुख व किरण नाईक यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा पत्रकार संघ अॅक्टिव्ह केला. जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष म्हणून हरीष पाटणे उत्कृष्ट काम करत आहेत. आम्ही ज्येष्ठांनी आता सल्लागाराच्या भूमिकेत राहिले पाहिजे. अधिस्वीकृतीबाबत पत्रकारांच्या समस्या दूर करण्याची धमक त्यांच्यात आहे.
हरीष पाटणे म्हणाले, ‘पुढारी’चे मुख्य संपादक डॉ. प्रतापसिंह जाधव व डॉ. योगेश जाधव यांनी मला ताकद दिली. जीवनधर चव्हाण यांची साथ लाभली. त्यामुळे माझ्या वृत्तपत्रातली माझी कारकिर्दही गाजत आहे. मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस.एम. देशमुख, किरण नाईक यांनी व सातारा जिल्हयातील सहकार्यांनी माझ्यावर सातारा जिल्हा पत्रकार संघाची जबाबदारी दिली. राज्यातला आक्रमक पत्रकार संघ उभा करण्यात आपण यशस्वी झालो. पत्रकार हल्ला विरोधी कायदा, ज्येष्ठ पत्रकारांना पेन्शन या लढ्यांचा साथीदार झालो. दिवंगत पत्रकारांच्या कुटुंबांना मदत करू शकलो, कोरोनाच्या काळात जिल्ह्यातील अकराही तालुक्यातील सहकार्यांच्या मदतीला धावून जावू शकलो आणि सर्वात महत्वाचे संघटनात्मक कामातील सातारा जिल्ह्यातील पत्रकारांचे प्रमुख स्वप्न असलेले ‘सातारा जिल्हा पत्रकार भवन’ खा. श्री. छ. उदयनराजे भोसले यांच्या मदतीने उभे करू शकलो याचा अभिमान आहे. जिल्हा पत्रकार संघाचा अध्यक्ष म्हणून माझी कारकीर्द वांझोटी गेली नाही. आता पुणे विभागाच्या अधिस्वीकृती समितीवर माझी नियुक्ती एस. एम. देशमुख व किरण नाईक यांनी केली आहे. अधिस्वीकृतीच्या अटी जाचक आहेत त्या शिथिल करून ग्रामीण भागातील सहकार्यांना सहज, सुलभ अधिस्वीकृती मिळावी. ज्येष्ठ पत्रकारांना हेलपाटे घालायला लागू नयेत यासाठी ही कारकिर्द पणाला लावेन. एस. एम. देशमुख व किरण नाईक यांच्या पाठीशी मराठी पत्रकार परिषदेचा प्रत्येक सहकारी उभा राहील.
विनोद कुलकर्णी म्हणाले, हरीष पाटणे, चंद्रसेन जाधव यांची अधिस्वीकृती समितीवर निवड झाल्याने राज्यात सातार्याची मान उंचावली आहे. जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष म्हणून हरीष पाटणे यांनी उत्तम काम केले आहे. त्यांना काम करताना त्यांना संघर्षही करावा लागला. कामात अडथळे आणले गेले. मात्र, पाटणे यांचा बेरीज करण्याचा स्वभाव आहे. आक्रमकता, प्रभावी जनसंपर्क, प्रत्येकाला मदत करण्याची वृत्ती यामुळे पाटणे यांनी अध्यक्षपदाची छाप पाडली आहे. जिल्ह्यातील अकराही तालुक्यातील पत्रकार त्यांच्या पाठीशी असल्याने त्यांची पुणे विभागीय अधिस्वीकृती समितीवर निवडही झाली. मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस. एम. देशमुख व किरण नाईक यांचे नेतृत्त्व आम्हा सगळ्यांना लाभले असून सर्वजण त्यांच्या पाठिशी आहेत. पत्रकारांचे प्रश्न सोडवण्यासाठी हरीष पाटणे यांची विभागीय अधिस्वीकृती समितीच्या अध्यक्षपदी निवड व्हायला हवी, अशी सातारा जिल्ह्याची सर्वमुखी मागणी आहे.
शरद काटकर म्हणाले, विभागीय अधिस्वीकृती समितीने राज्य समितीकडे रेटा लावणे आवश्यक आहे. पत्रकारांना अधिस्वीकृती कार्ड व पेन्शन मिळण्यासाठी पूर्वीची व्यवस्था मोडून काढावी लागेल. ते काम हरीष पाटणे व चंद्रसेन जाधव करतील. तुषार भद्रे म्हणाले, जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष हरीष पाटणे यांना कामाचा उरक आहे. अन्यायाविरोधात ते पत्रकारांची फौज उभी करतात. पुणे विभागीय अधिस्वीकृती समितीवर त्यांची झालेली निवड योग्य आहे. पत्रकारांच्या सर्व संघटना त्यांच्या सत्कार सोहळ्याला उपस्थित राहिल्याने त्यांची ताकद लक्षात येते.
श्रीकांत कात्रे म्हणाले, हरीष पाटणे व चंद्रसेन जाधव यांची झालेली निवड सातार्यासाठी अभिमानास्पद आहे. अधिस्वीकृतीतील जाचक अटी कमी व्हाव्यात यासाठी समितीने काम करावे. दीपक शिंदे म्हणाले, हरीष पाटणे यांच्या नियुक्तीचा आनंद सातारा जिल्ह्याला झाला आहे. पाटणे आणि जाधव सातार्याच्या पत्रकारितेचा डंका वाजवतील.
यावेळी ज्येष्ठ पत्रकार दत्ता मर्ढेकर, सुजित आंबेकर,राहूल तपासे, अरूण जावळे, गजानन चेणगे,दादासाहेब चोरमले, डॉ. प्रमोद फरांदे, ओंकार कदम, जयंत लंगडे यांनीही यावेळी मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन सनी शिंदे यांनी केले. यावेळी सातारा जिल्हा पत्रकार संघ, सातारा पत्रकार संघ, सातारा इलेक्ट्रॉनिक मीडिया संघ, सातारा डिजीटल मीडिया परिषदेचे सर्व सदस्य, पत्रकार, जिल्ह्यातून आलेले पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
You must be logged in to post a comment.