जीवनगाणे’तून मानसिक आरोग्याचा संदेश!

जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त साताऱ्यात सुरेल मैफलीचे आयोजन

सातारा, (प्रतिनिधी) : ‘जागतिक मानसिक आरोग्य दिना’निमित्त साताऱ्यातील निर्मिती संस्था आणि इंडियन मेडिकल असोसिएशन (आयएमए) यांच्या संयुक्त विद्यमाने ‘सप्तसूर’ प्रस्तुत हिंदी-मराठी गीतांची मनमोहक मैफल ‘जीवनगाणे’ रविवार, १२ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ५ वाजता आयएमए हॉल, पारसनीस कॉलनी, सातारा येथे रंगणार आहे.

साताऱ्यातील आयएमए, निर्मिती संस्था आणि मैत्र वेलनेस या संस्था सामाजिक बांधिलकी जपत रक्तदान, आरोग्य शिबिरे, मानसिक आरोग्य, आत्महत्या प्रतिबंध आणि तणाव व्यवस्थापन यांसारख्या विविध प्रबोधनात्मक उपक्रमांद्वारे जनजागृतीचे कार्य सातत्याने करत आहेत.जागतिक मानसिक आरोग्य दिनाचे औचित्य साधून आयोजित ‘जीवनगाणे’ या कार्यक्रमात ‘सप्तसूर’ गायक समूह नयनरम्य हिंदी आणि मराठी गीतांचा संगम सादर करणार आहे.

संगीताच्या माध्यमातून जीवनातील संघर्ष, आनंद, आशा आणि प्रेरणेचा प्रवाह उलगडत, ही मैफल रसिकांना तणावमुक्ततेचा आणि आत्मसंवादाचा अनुभव देईल, असा विश्वास डॉ. अनिमिष चव्हाण यांनी व्यक्त केला आहे.

हा कार्यक्रम सर्व नागरिकांसाठी विनामूल्य असून, सातारकर रसिकांनी या सुमधुर आणि प्रेरणादायी संध्याकाळसाठी उपस्थित राहावे, असे आवाहन या उपक्रमाचे निमंत्रक निर्मिती संस्थेचे अध्यक्ष व मैत्र वेलनेसचे संचालक डॉ. अनिमिष चव्हाण, उपाध्यक्षा डॉ. वैशाली चव्हाण, सचिव प्राची मास्तोळी, तसेच आयएमएचे अध्यक्ष डॉ. दीपक थोरात, सचिव डॉ. संदीप आठवले आणि कोषाध्यक्ष डॉ. युवराज साळुंखे यांनी केले आहे.

error: Content is protected !!