३.४ रिश्टर स्केल तीव्रता; धरण सुरक्षित असल्याची प्रशासनाची माहिती

सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) : पाटण तालुक्यातील कोयना धरण परिसराला मध्यरात्री १२ वाजून ९ मिनिटांनी भूकंपाचा सौम्य धक्का बसला. ३.४ रिश्टर स्केल इतकी नोंदवलेली तीव्रता सौम्य स्वरूपाची असल्याने धक्का केवळ कोयनानगर परिसरापुरताच जाणवला. केंद्रबिंदू हेळवाक गावाच्या नैऋत्येला अवघ्या तीन किलोमीटर अंतरावर होता. दरम्यान, भूकंपानंतर कोयना धरणाला कोणताही धोका नसल्याचे जिल्हा प्रशासन व धरण व्यवस्थापनाने स्पष्ट केले. तसेच पाटण तालुक्यात कुठेही पडझड झालेली नसल्याचेही सांगण्यात आले.
पाटण तालुका आणि कोयना धरण परिसर भूकंप प्रवण क्षेत्र म्हणून ओळखला जातो. या भागात लहानमोठ्या भूकंपांचे धक्के वारंवार जाणवतात. यावर्षांमध्ये याअगोदर ५ जानेवारी रोजी २.४ रिश्टर तीव्रतेचा आणि १५ ऑगस्ट रोजी २.९ रिश्टर तीव्रतेचा भूकंप नोंदला गेला होता.

दरम्यान, सततच्या भूगर्भीय हालचालींचा सखोल अभ्यास करण्यासाठी कोयना धरण परिसरात अत्याधुनिक यंत्रणा बसविण्याची प्रक्रिया सुरू आहे. धरणाच्या तळाशी, मध्यभागी आणि वरच्या भागात बसवण्यात येणाऱ्या उपकरणांमुळे हालचालींचा तपशीलवार अभ्यास होणार असून, धरणाची सुरक्षा अधिक बळकट होईल, अशी माहिती धरण व्यवस्थापनाने दिली.
ऐतिहासिक पार्श्वभूमी

कोयना धरण परिसराचा भूकंपाशी जवळचा संबंध आहे. ११ डिसेंबर १९६७ रोजी या भागाला ६.३ रिश्टर स्केल तीव्रतेचा भीषण भूकंप बसला होता. हा भूकंप कोयना धरण परिसरातील जलसाठ्यामुळे भूगर्भीय दाब वाढल्याने झाल्याचे तज्ज्ञांनी नमूद केले होते. त्यावेळी मोठ्या प्रमाणावर जीवितहानी व घरांचे नुकसान झाले. त्यानंतर या भागाला भूकंप प्रवण क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले.

You must be logged in to post a comment.