सातारा (भूमिशिल्प वृत्तसेवा ): विचार, आचार आणि कृतीतून प्रत्येक जण आपल्या जीवनात सक्रिय असतो, मात्र अवयवदानातून आपण मृत्यूनंतरही जिवंत राहू शकतो. कोमल न्यू लाईफ फौंडेशन’चे कार्य त्यादृष्टीने खूपच महत्त्वपूर्ण व सामाजिक बांधिलकी जपणारे आहे, असे प्रतिपादन साताऱ्यातील सुप्रसिद्ध हृदयरोगतज्ज्ञ डॉ. सोमनाथ साबळे यांनी कोमल न्यू लाईफ फौंडेशनच्या वर्धापनदिनी बोलताना केलं.
… म्हणून कोमल न्यू लाईफ फौंडेशनची स्थापना
अवयवदानाच्या प्रचार व प्रसारासाठी कार्यरत असणाऱ्या कोमल न्यू लाईफ फौंडेशनचा पाचवा वर्धापन दिन सातारा येथील कर्मवीर भाऊराव पाटील कॉलेज ऑफ इंजिनीरिंगच्या सभागृहात नुकताच पार पडला. त्यावेळी डॉ. सोमनाथ साबळे बोलत होते. ‘अवयवदानाच्या रुपानं मिळणारं पुनर्जीवन म्हणजेच मृत्यूवर विजय आहे आणि यासाठी हे फौंडेशन मोलाचं कार्य करत आहे,’ अशा शब्दांत त्यांनी फौंडेशनच्या कार्याचं कौतुक केलं.
कोमलनं लावलेलं रोपटं आता मोठं होऊ लागलंय
एकाच वेळी हृदय व दोन्ही फुफुसांच्या प्रत्यारोपणाची भारतातील पहिली यशस्वी शस्त्रक्रिया जिच्यावर झाली ती साताऱ्याची कन्या कोमल पवार-गोडसे ही सर्वांनाच माहीत आहे. अवयव प्रत्यारोपणाच्या माध्यमातून तिला पुनर्जन्म मिळाला होता. त्याप्रती ऋणी राहून, समाजात अवयवदानाबद्दल जनजागृती करण्यासाठी कोमल व तिचे पती धीरज विलासराव गोडसे यांनी या फौंडेशनची स्थापना केली. 1 सप्टेंबर 2020 रोजी कोमलनं या जगाचा निरोप घेतला पण तिनं लावलेलं हे फौंडेशनचं रोपटं आता मोठं होऊ लागलंय. धीरज गोडसे यांनी हे कार्य तिच्या पश्चातही तितक्याच जोमानं सुरू ठेवलंय.वर्धापन दिन कार्यक्रमास डॉ. सोमनाथ साबळे, ‘यशोदा टेक्निकल कॅम्पस सातारा’ चे संचालक डॉ. विवेक कुमार रायदासानी यांची प्रमुख उपस्थिती होती. ‘अवयवांच्या प्रतीक्षेत असलेल्या रुग्णांना वेळेत अवयव उपलब्ध होणं गरजेचं असून त्यासाठी व्यापक जनजागृती हाच एक मार्ग आहे आणि म्हणूनच आपण सर्वांनी कोमल न्यू लाईफ फौंडेशनच्या चळवळीत सहभागी व्हायला हवं,’ असं आवाहन डॉ. साबळे यांनी केलं. धीरज गोडसे यांनी फौंडेशनचं कार्य आणि अवयवदानाचं महत्त्व याबाबत विचार मांडले. याप्रसंगी यशोदा टेक्निकल कॅम्पसचे विद्यार्थी व इतरांनी अवयवदानाची शपथ दिली तर फौंडेशनच्या कार्यास सहकार्य करणाऱ्या विविध संस्थांचे प्रतिनिधी व सहभागी व्यक्तींना सन्मानपत्र देऊन गौरवण्यात आलं. डॉ. विवेक कुमार रायदासानी यांनी प्रास्ताविक केलं तर वैदेही कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन केलं.
‘त्या’ दोघांची उपस्थिती ठरली प्रेरणादायी !
हृदय व फुफुस प्रत्यारोपणानंतर सामान्य आयुष्य जगणारे किरण कदम आणि किडनी प्रत्यारोपण झालेले राणे हे दोघेही फौंडेशनच्या पहिल्या वर्धापन दिनी उपस्थित होते. प्रत्यारोपणानंतर किरण कदम यांनी आपली डॉक्टरेट पूर्ण केलीये तर राणे यांना त्यांच्या वडलांनीच किडनी देऊन जीवनदान दिलं आहे. या प्रत्यारोपण झालेल्या रुग्णांची उपस्थिती सर्वांसाठी प्रेरणादायी ठरली. कोमल न्यू लाईफ फाऊंडेशनमुळं केवळ आपल्यालाच नव्हे तर हजारो जणांना नवीन आयुष्य मिळालं, असे गौरवोद्गार त्यांनी काढले.
You must be logged in to post a comment.