जिल्हा रुग्णालयात रेडीओ थेरपी युनिट, स्वतंत्र डायलेसिस विभाग तसेच अत्याधुनिक कार्डियाक कॅथलॅब उभारण्यात येणार

सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) : जिल्ह्यातील रुग्णांना साताऱ्यातच अत्यावश्यक उपचार उपलब्ध व्हाव्यात यासाठी आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसलेयांच्या पाठपुराव्यातून येथील जिल्हा रुग्णालयात कॅन्सर रुग्णांसाठी रेडीओ थेरपी युनिट, स्वतंत्र डायलेसिस विभाग तसेच अत्याधुनिक कार्डियाक कॅथलॅब उभारण्यात येणार आहे.

कॅथलॅब, डायलिसिस युनिट आणि रेडिओ थेरपी विभाग सुरू करण्याबाबत शिवेंद्रसिंहराजेंच्या सूचनेनुसार जिल्हा रुग्णालय आणि जिल्हा प्रशासनाने परिपूर्ण प्रस्ताव राज्य शासनाकडे सादर केले आहेत. अधिवेशन काळात आमदार शिवेंद्रसिंहराजे यांनी यासंदर्भाने उपमुख्यमंत्री फडणवीस आणि आरोग्य मंत्री सावंत यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी साताऱ्यात हृदयरोग उपचारासाठी सुसज्ज कार्डियाक कॅथलॅब उभारण्यासाठी ९ कोटी ८२ लाख ३० हजार ४४० रुपये निधी उपलब्ध करून द्यावा, तसेच जिल्हा रुग्णालयात जिल्ह्यातील कॅन्सरग्रस्त रुग्णांसाठी अद्यावत रेडिओ थेरपी युनिट सुरु करण्यासाठी ४९ कोटी ५३ लाख ३५ हजार रुपये निधी उपलब्ध करून देण्याची मागणी केली. याशिवाय किडनी विकाराने त्रस्त रुग्णांसाठी जिल्हा रुग्णालयात स्वतंत्र अत्याधुनिक डायलेसिस विभाग सुरु करावा आणि त्यासाठी ४ कोटी ३८ लाख ७३ हजार ७५० रुपये निधी उपलब्ध करून देण्यात यावा. याबबतचे परिपुर्ण प्रस्ताव शासनाला सादर करण्यात आले असून जिल्हावासीयांना दर्जेदार आरोग्य सेवा देण्यासाठी तिन्ही प्रस्तावाना तातडीने मंजुरी देण्यात यावी, अशी मागणी शिवेंद्रसिंहराजे यांनी केली. तशा आशयाचे निवेदनही दोन्ही मंत्र्यांना दिले.

दरम्यान, शिवेंद्रसिंहराजे यांच्या मागणीनुसार तीनही प्रस्तावांना मंजुरी देण्याचा निर्णय उपमुख्यमंत्री फडणवीस आणि आरोग्यमंत्री सावंत यांनी घेतला असून लवकरच या कामांसाठी निधी उपलब्ध होणार आहे. शिवेंद्रसिंहराजे यांच्यामुळे जिल्ह्यातील हृदयरोग, कॅन्सरग्रस्त आणि डायलिसिस रुग्णांची हेळसांड थांबून त्यांना साताऱ्यातच अद्ययावत उपचार सुविधा मिळणार आहे. यामुळे जिल्हावासीयांची मोठी गैरसोय दूर होणार आहे.

error: Content is protected !!