आ. शिवेंद्रसिंहराजेंवर शुभेच्छांचा वर्षाव

सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) : आमदार श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी कला व वाणिज्य महाविद्यालयाच्या मैदानावर बुधवारी रात्री जनसैलाब उसळला.

सातारा आणि जावली तालुक्यातील जनतेसह जिल्ह्यातील विविध तालुक्यातील जनतेने आ. शिवेंद्रसिंहराजेंच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला. दरम्यान, सर्वांचे आशीर्वाद, प्रेम आणि सदिच्छा कायम पाठीशी राहू द्या. केव्हाही हाक द्या, तुमच्यासाठी २४ तास उपलब्ध आहे, असा शब्द आ. शिवेंद्रसिंहराजेंनी जनतेला दिला. आ. शिवेंद्रसिंहराजेंच्या वाढदिवसानिमित्त बुधवारी सकाळपासूनच कार्यक्रमांची रेलचेल सुरु होती. सकाळी ८ ते दुपारी २ यावेळेत गांधी मैदान, राजवाडा येथे महारुद्र पंचायतन महायज्ञ हा भव्यदिव्य सोहळा उत्साहात संपन्न झाला. दुपारी ४.३० वाजता यवतेश्वर येथे आ. शिवेंद्रसिंहराजेंच्या विशेष प्रयत्नातून झालेल्या कास पठार, बामणोलीकडे जाणाऱ्या सुसज्ज रस्त्यावर स्व. श्रीमंत छ. अभयसिंहराजे भोसले कमानीचे उदघाटन मोठ्या उत्साहात पार पडले. सायंकाळी पोवई नाका येथे शिवतीर्थावर शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास महाभिषेक आणि हेलिकॉप्टरवरून पुष्पवृष्टी करण्यात आली. तसेच मंगळवार पेठेतील आनंदाश्रम, लक्ष्मीबाई पाटील वसतिगृह सोमवार पेठ, रिमांडहोम सदरबझार, आशा भवन कोडोली, मातोश्री वृद्धाश्रम खावली, एहसास मतिमंद शाळा वळसे, भिक्षेकरी गृह जरंडेश्वर नाका, जिल्हा रुग्णालय सातारा (रुग्ण नातेवाईक), आर्यांग्ल हॉस्पिटल (रुग्णांना), शाहू बोर्डिंग धननीची बाग, मदरसा कब्रस्थान आणि मदरसा मोळाचा ओढा याठिकाणी आ. शिवेंद्रसिंहराजे यांच्या तर्फे मिष्टान्न भोजन वाटप करण्यात करण्यात आले.

सायंकाळी कोटेश्वर मैदानाजवळील कला व वाणिज्य कॉलेजच्या मैदानावर आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी जनतेच्या शुभेच्छांचा स्वीकार केला. सुरुवातीला पुष्पप्रदर्शनाचे आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी उदघाटन केले. सायंकाळी ६ पासूनच या मैदानावर हळूहळू गर्दी जमू लागली. काही वेळाने आ. शिवेंद्रसिंहराजे कार्यक्रमस्थळी दाखल झाले आणि जोरदार फटाक्यांची आतिषबाजी सुरु झाली. उपस्थित कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला. कार्यक्रमस्थळी भव्यदिव्य स्टेजवर आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी जनतेच्या शुभेच्छांचा स्वीकार करण्यास सुरुवात केली. काही वेळाने सातारा शहर आणि उपनगरातील नागरिकांचे जथ्थे कार्यक्रमस्थळी दाखल होऊ लागले. दोन्ही तालुक्यातील कार्यकर्ते आणि शिवेंद्रसिंहराजेप्रेमी हजारोच्या संख्येने उपस्थित होते. आ. शिवेंद्रसिंहराजेंचा जयजयकार करत कार्यकर्ते आणि नागरिक आ. शिवेंद्रसिंहराजेंना शुभेच्छा देत होते. सायंकाळी आठच्या सुमारास मैदान खचाखच भरून गेले. माता, भगिनी, अबालवृद्धांसह अवघा जनसागर आ. शिवेंद्रसिंहराजेंना शुभेच्छा देण्यासाठी लोटला होता. आ. शिवेंद्रसिंहराजेंसोबत फोटो आणि सेल्फी काढण्यासाठी लोकांची झुंबड उडत होती. एका बाजूने स्टेजवर जाऊन आ. शिवेंद्रसिंहराजेंना शुभेच्छा देऊन लोक स्टेजच्या दुसऱ्या बाजूने खाली उतरत होते. रात्री उशिरापर्यंत आ. शिवेंद्रसिंहराजेंवर शुभेच्छांचा वर्षाव सुरूच होता. दरम्यान, राज्याचे उपमुख्यमंत्री ना. अजित पवार, विरोधी पक्षनेते देवेन्द्र फडणवीस, चंद्रकांतदादा पाटील, सुधीर मुनगंटीवार यांच्यासह अनेक मंत्री व विविध पक्षाच्या नेते मंडळींनी आ. शिवेंद्रसिंहराजेंना फोनवरून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.

error: Content is protected !!