सात हजार रुपये दंड आकरल्याने दुचाकी चालकाने केला आत्महत्येचा प्रयत्न

सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) : ट्रिपल सीट वाहन चालविल्याप्रकरणी दंड भरण्यास सांगितल्यामुळे वाहतूक पोलिसासमोरच अंगावर डिझेल ओतून आत्महत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी दुचाकीस्वारावर शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

युवराज लोखंडे (वय ३४, मूळ रा. कामेरी, ता. सातारा, सध्या रा. शाहूपुरी) असे दुचाकीस्वाराचे नाव आहे. याबाबत वाहतूक पोलिस सोमनाथ शिंदे यांनी फिर्याद दिली आहे. आज दुपारी अडीचच्या सुमारास शिंदे हे येथील मुख्य बस स्थानकासमोर वाहतूक नियमनाचे काम करत होते. या वेळी लोखंडे हा ट्रीपलसीट वाहन चालवत आला. त्याला शिंदे यांनी अडविले. त्याच्याकडे लायसन्सही नव्हते. त्यामुळे शिंदे यांनी लायन्सस नाही, म्हणून पाच हजार, ट्रीपलसीटचा दंड एक हजार, नंबर प्लेट नसल्यामुळे ५००, तसेच मोठा हॉर्न लावल्यामुळे शंभर असा सुमारे सात हजार रुपये दंड भरावा लागेल, असे सांगितले.चिडून तो पळतच भूविकास बॅंकेजवळ असलेल्या पेट्रोल पंपावर गेला. तेथून कॅनमधून डिझेल घेऊन परत आला. त्यानंतर त्याने शिंदे यांच्यासमोरच डिझेल अंगावर ओतून घेतले. मात्र, काडी पेटविण्याआधीच त्याला नागरिकांनी पकडले. या प्रकाराची माहिती मिळाल्यानंतर शहर पोलिस तातडीने घटनास्थळी आले. त्यांनी लोखंडेला ताब्यात घेऊन पोलिस ठाण्यात नेले.

error: Content is protected !!