साताऱ्यातील आयुर्वेदिक गार्डनमध्ये होणार स्पर्धा परीक्षार्थींसाठी सुसज्ज लायब्ररी

सातारा, (भूमीशिल्प वृत्तसेवा) : खासदार उदयनराजे भोसले यांनी दिलेल्या शब्दाप्रमाणे, सातारच्या आयुर्वेदिक गार्डनमध्ये रुपये 75 लाखांच्या अंदाजपत्रकीय रक्कमेची स्पर्धा परिक्षांना उपयुक्त ठरणारी सुसज्ज लायब्ररी आणि अभ्यासिका लवकरच साकारणार असून, याकरीता स्थानिक जिल्हा प्रशासनाकडून आवश्यक तो निधी मंजूर करुन घेण्यात आला आहे. निवडणुकीच्या दरम्यान खासदार श्रीमंत छत्रपती उदयराजे भोसले यांनी युवकांना दिलेला शब्द सार्थ ठरणार आहे, अशी माहिती नगरसेवक ॲङ डी. जी. बनकर यांनी एका प्रसिध्दीपत्रकाव्दारे दिली आहे.

याबाबत ॲङ बनकर यांनी दिलेल्या प्रसिध्दीपत्रकात पुढे नमुद केले आहे की, उदयनराजे भोसले यांनी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर अनेक महाविद्यालयांना भेटी देवून, युवकांशी संवाद साधला होता. त्यावेळी युवकांच्या समस्यांविषयी चर्चा करताना, स्पर्धापरिक्षांचा अभ्यास आणि त्यासाठी आवश्यक असणारे संदर्भग्रंथ यांची युवकांना कमतरता जाणवत आहे. सुसज्य अभ्यासिका आणि लायब्ररी व्हावी अशी अपेक्षा अनेक महाविद्यालयीन युवकांनी व्यक्त केली होती. त्यावेळी अशी अभ्यासिका उभारणेबाबत खासदारउदयनराजे भोसले यांनी आश्वासन दिले होते.
त्याबाबत सातत्याने पाठपुरावा करुन, सातारा नगरपरिषदेच्या मालकीच्या असणा-या श्रीमंत छत्रपती प्रतापसिंहमहाराज उर्फ दादामहाराज आयुर्वेदिक गार्डन मध्ये लायब्ररी आणि अभ्यासिक उभारणेचे काम हाती घेण्यात आले. आयुर्वेदिक गार्डनमध्ये सुमारे 4 हजार स्के.फुटाचे बांधकाम उभारुन सुसज्य लायब्ररी आणि स्पर्धापरिक्षा अभ्यासिका उभारणेत येणार आहे. त्यासाठी रुपये 75 लाखांचे अंदाजपत्रक तयार करण्यात आले असून, स्थानिक जिल्हा प्रशासनाकडून याकामी निधी उपलब्ध करुन घेण्यात आला आहे.

आयुर्वेदिक गार्डनमध्ये असणारे शांत,निसर्गसंपन्न आणि प्रसन्न वातावरण, अभ्यासिकेत येणा-या प्रत्येकाच्या प्रयत्नांना सहाय्यभुत ठरणार आहे. एमपीएससी, युपीएससी, आणि तत्सम स्पर्धा परिक्षांकरीता हायटेक लायब्ररी, ई.लायब्ररी, अनुभवी तज्ज्ञांचे मार्गदर्शन, एक-दोन दिवसीय चर्चासत्रे,शिबीरे, नामवंत वक्त्यांची व्याख्याने इ. विधायक आणि सपर्धापरिक्षांना पुरक ठरणारे उपक्रम याठिकाणी राबविले जाण्याची सुविधा निर्माण होणार आहे. अनेक महाविद्यालयांना मध्यवर्ती असलेल्या आणि बाहेरुन येणा-या विद्यार्थ्यांनाही सोयीचे ठरणा-या आयुर्वेदिक गार्डनमधील सुसज्य लायब्ररी आणि अभ्यासिका यांचा अनेक तरुणांना निश्चितच ध्येय्य पूर्तीच्या अध्ययनास उपयुक्त ठरणार आहे.
खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्यामुळे आयुर्वेदिक गार्डनमध्ये साकारणारी लायब्ररीची सुसज्य इमारत युवकांसाठी प्रेरणास्थान म्हणून ओळखली जाईल ही फार मोठी उपलब्धी खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजेंच्या मुळे युवकांना लाभणार आहे असेही ॲङ बनकर यांनी प्रसिध्दीपत्रकात नमुद केले आहे.

error: Content is protected !!