सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) : सातारा नगरपरिषदेचे मुख्याधिकारी अभिजीत बापट यांची पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या उपायुक्तपदी बदली झाली होती तर सातारा पालिकेच्या मुख्याधिकारीपदी भोरचे मुख्याधिकारी डाॅ. विजयकुमार थोरात यांची बदली झाली होती. दरम्यान, मंत्रालयात झालेल्या लाॅबिंगनंतर नाट्यमयरित्या बापट यांच्या जागी पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या उपायुक्तपदी डाॅ. थोरात यांची बदली झाल्याने सातारा नगरपालिकेचा कारभार पुन्हा बापट यांच्याच हाती येणार असल्याची चर्चा रंगू लागली आहे.
सातारा पालिकेत गेल्या पंधरा दिवसांपूर्वी मुख्याधिकारी अभिजीत बापट यांची पिंपरी चिंचवड येथे महापालिका उपायुक्तपदी तर भोर नगरपालिकेचे मुख्याधिकारी विजयकुमार थोरात यांची साताऱ्यात बदली झाल्याचे आदेश नगरविकास विभागाने काढले होते.अभिजित बापट यांच्याकडे सातारा पालिका व जिल्हाधिकारी कार्यालयातील नगरपालिका प्रशासन अधिकाऱ्याची जबाबदारी होती. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांकडून त्यांना कार्यमुक्त करण्यात आले नव्हते. तर पुणे जिल्हाधिकाऱ्यांनी डॉ. विजयकुमार थोरात यांना देखील कार्यमुक्त केले नव्हते.
गेल्या पंधरा दिवसांपासून मुख्याधिकारीपदावरून अनेक राजकीय घडामोडी घडल्या. अभिजित बापट यांच्या घरवापसीसाठी मंत्रालय स्तरावर जोरदार मोर्चेबांधणी करण्यात आली. मात्र अचानकच बापट यांनी पिंपरी-चिंचवड आयुक्तांकडे आपले नियुक्ती पत्र सादर केले व ते रजेवर गेले. त्यामुळे सातारा पालिकेला मुख्याधिकारी कोण असा प्रश्न अनेकांना पडला होता.अखेर या बदली नाट्यावर बुधवारी पडदा पडला आणि सर्व चित्र स्पष्ट झाले.
डॉ. विजयकुमार थोरात साताऱ्यात हजर होण्यापूर्वी त्यांची पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या उपायुक्तपदी बदली करण्यात आली. हजर होण्यापूर्वीच थोरात यांच्या बदलीची ऑर्डर निघाल्याने पालिका वर्तुळात आश्चर्य व्यक्त होत आहे. या सर्व हालचालीमुळे अभिजित बापट पुन्हा सातारा नगरपालिकेचे मुख्याधिकारी म्हणून येणार असल्याच्या चर्चा साताऱ्यात रंगू लागल्या आहेत .
You must be logged in to post a comment.