कार-ट्रकच्या धडकेत दोन ठार

सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) : पुणे-बंगलोर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चारवरील सुरुर उड्डाणपूलावर उभ्या असलेल्या मालट्रकला पाठीमागून आलेल्या कारने धडक दिली. यामुळे झालेल्या अपघातात दोनजण ठार झाले. हा अपघात गुरुवार, दि. २५ रोजी मध्यरात्रीच्या सुमारास घडला. केदार वेल्लळ, अजय रवींद्र सुतार अशी अपघातात ठार झालेल्यांची नावे आहेत.

भुईंज पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महामार्गावर गुरुवारी मध्यरात्री सुरुर उड्डाणपूलावर मालट्रकचा टायर फुटल्याने तो उभा करण्यात आला होता. या उभ्या असलेल्या मालट्रकला पाठीमागाहून येणाऱ्या कार (एमएच ०४ जीडी १२०५) च्या चालकाने ठोकर दिली. यामध्ये गाडीतील केदार दत्तात्रय वेल्लळ (वय २५) व अजय रवींद्र सुतार (२७, रा. मसूर, ता. कऱ्हाड) हे दोनजण गंभीर जखमी झाले. त्यांना पुढील उपचारासाठी सातारा येथे दाखल करण्यात आले. उपचारा दरम्यान त्यांचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय सूत्रांनी सांगितले. दोन्ही वाहने साताऱ्याचे दिशेने येत होती.

अंधारातही सुरुर ग्रामस्थांनी मदतकार्य देऊन भुईंज पोलिसांना घटनास्थळी बोलवले. भुईंज पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक आशिष कांबळे, पोलीस उपनिरीक्षक रत्नदीप भांडारे, हवालदार विजय अवघडे, हवालदार सचिन नलवडे वाघ तपास करीत आहेत.

error: Content is protected !!