शिवथरच्या खून प्रकरणातील आरोपी आठ तासात ताब्यात

मृत महिलेच्या प्रियकरानेच दिली खूनाची कबुली

सातारा,(भूमिशिल्प वृत्तसेवा) : शिवथर, ता. सातारा येथील एका विवाहित महिलेचा तिच्या राहत्या घरी गळ्यावर धारदार शस्त्राने वार करून खून करण्यात आला होता. हा खून तिच्या प्रियकरानेच केल्याचे उघड झाले असून, सातारा तालुका पोलिसांनी अवघ्या ८ तासांत हा गुन्हा उघडकीस आणून संशयित आरोपीस अटक केली आहे.

पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, दि. ७ जुलै रोजी दुपारी १२ ते ३.३० च्या सुमारास सातारा तालुक्यातील शिवथर या गावात एका अनोळखी व्यक्तीने घरात घुसून विवाहित महिलेचा निर्घृण खून केला होता. या प्रकरणी सातारा तालुका पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा नोंदवण्यात आला होता. भर दिवसा घरात घुसून महिलेचा खून झाल्याच्या या घटनेने जिल्हा हादरला होता.पोलीस अधीक्षक तुषार दोशी, अप्पर पोलीस अधीक्षक वैशाली कडुकर आणि उपविभागीय पोलीस अधिकारी राजीव नवले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक निलेश तांबे यांच्या नेतृत्वाखाली या प्रकरणाच्या तपासासाठी विशेष पथक तयार करण्यात आली.

तपासादरम्यान मिळालेल्या गोपनीय माहितीवरून या खुनामागे पीडितेचा गावातच राहणारा प्रियकर असल्याचे निष्पन्न झाले. संबंधित विवाहितेचे गेल्या सहा वर्षांपासून आरोपीशी अनैतिक संबंध असल्याचे स्पष्ट झाले असून पळून जावून लग्न करण्यास संबंधित विवाहिता तयार नसल्याने संशयिताने खून केल्याचे स्पष्ट झाले आहे.

सातारा पोलीस दलाच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या तपास पथकाने तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय माहितीच्या आधारे आरोपीचा स्वारगेट (पुणे) येथे माग काढला आणि त्यास अटक करण्यात यश मिळवले.या कारवाईत सहभागी अधिकारी-पोलिसांचे कौशल्य व तत्परता उल्लेखनीय ठरली असून, सातारा तालुका पोलिसांनी केवळ ८ तासांत गुन्ह्याचा छडा लावून संशयित आरोपीस अटक केली.

या प्रकरणाचा तपास पोलीस अधीक्षक तुषार दोशी, अतिरिक्त पोलीस अधीक्षक वैशाली कडुकर, पोलीस निरीक्षक निलेश तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली स.पो.नि. विनोद नेवसे हे करत असून सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल मोरडे, पोलीस उपनिरीक्षक अभिजीत गुरव, पोलीस उपनिरीक्षक सोनू शिंदे, हवालदार दादा स्वामी, पंकज ढाणे, राजू शिखरे, मालोजी चव्हाण, मनोज गायकवाड, रामचंद्र गोरे, संदीप आवळे, राहुल राऊत, सचिन पिसाळ, हवालदार कुमठेकर, महिला हवालदार विद्या कुंभार, मोना बोराटे, हवालदार सतीश बाबर, प्रदीप मोहीते, सुनील भोसले, संदीप पांडव, संदीप फणसे या अधिकारी-कर्मचाऱ्यांनी कौशल्यपूर्ण आणि शिताफीने आरोपीला अटक केली.

error: Content is protected !!