सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) : “माझ्यावर मोक्का लावू नका… मी काही साताऱ्यात राहणार नाही… मला जगायचं नाही… माझं जगणं मुश्कील झालंय… मी आता जीवच देतो…’ असं म्हणत मोक्काखाली नुकतीच अटक करण्यात आलेल्या निखिल वाघमळे या आरोपीनं अतिरिक्त पोलिस अधीक्षक धीरज पाटील यांच्यासमोरच कपाळावर बेड्या मारून घेत आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना घडली. अतिरिक्त पोलिस अधीक्षकांच्या दालनात आज सायंकाळी घडलेल्या या घटनेमुळं सर्वत्र एकच खळबळ उडाली. दरम्यान, आत्महत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी निखिल वाघमळे याच्याविरुद्ध सातारा शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
सातारा जिल्ह्यातील वाढती गुन्हेगारी रोखण्यासाठी सातारचे नूतन पोलिस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांनी दिलेल्या प्रतिबंधात्मक कारवाईच्या आदेशानुसार तीन टोळ्यांमधील 27 जणांवर संघटित गुन्हेगारी अंतर्गत (मोक्का) कारवाई करण्यात आली. या कारवाई अंतर्गत अक्षय लालासाहेब पवार, निखिल प्रकाश वाघमळे आणि अनिकेत ऊर्फ बंटी नारायण जाधव या टोळी प्रमुखांनाही अटक करण्यात आली होती. यातील मोक्काखाली अटकेत असलेल्या निखिल प्रकाश वाघमळे (वय २८, आरळे, ता. सातारा) याला सातारा तालुका पोलिस ठाण्यातील शिपाई दिगंबर वाघेरे आणि पोलिस नाईक एच. एस. शिंदे हे दोघेजण आज सायंकाळी अधिक तपासासाठी पोलिस मुख्यालयातील अतिरिक्त पोलिस अधीक्षक धीरज पाटील यांच्या कार्यालयात घेऊन गेले होते. त्यावेळी वाघमळेच्या हातात बेड्या होत्या मात्र तपास सुरू झाल्यानंतर त्यानं अचानक ‘माझ्यावर मोक्का लावू नका… मी काही साताऱ्यात राहणार नाही… मला जगायचं नाही… माझं जगणं मुश्कील झालंय… मी आता जीवच देतो…’ असं म्हणत पटकन खाली वाकून हातातील बेडी कपाळावर जोरात मारून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, याप्रकरणी निखिल वाघमळे याच्याविरुद्ध आत्महत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी सातारा शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असल्याचं पोलिसांकडून सांगण्यात आलं.
You must be logged in to post a comment.