सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) : सातारा एम.आय.डी.सी.तील बडया उद्योजकांनी बेकायदेशीरपणे अतिक्रमणे केली होती, त्याविरोधात एम.आय.डी.सी.च्या कार्यालयाकडे वारंवार तक्रारी करुन पाठपुरावा केला होता परंतु त्यांनी कोणतीच कारवाई न केल्याने अखेर लोकायुक्तांकडे पुराव्यासह तक्रार दाखल केली होती. त्यांनी त्याची दखल घेऊन एम.आय.डी.सी.मधील बडया उद्योजकांच्या 12 अतिक्रमणांवर कारवाई केल्याची माहिती सामाजिक आणि माहिती अधिकार कार्यकर्ते सुशांत मोरे यांनी पत्रकार परिषदेत दिली. त्याचप्रमाणे बेकायदेशीपणे अतिक्रमण करणा-या प्रत्येकाच्या विरोधात माझा शेवटचा श्वासापर्यंत कोणाच्याही दबावाला बळी न पडता लढा राहील, असेही त्यांनी स्पष्ट केले.
सातारा शहरापासून जवळ असलेल्या एम.आय.डी.सी.मध्ये अनेक उद्योजकांनी आपल्या कंपन्या, वर्कशॉप उभे केले आहेत परंतु त्यातील अनेकांनी मंजूर प्लॅनप्रमाणे बांधकाम न करता अतिक्रमण केले होते. त्यामध्ये हेम एजन्सीज, हिरा एंटरप्रायझेस, कूपर कार्पोरेशन, हिरा फूडस, झेड.एस. इंजिनियर्स, नंदकुमार माने यांच्यासह अनेकांनी अतिक्रमण केले होते. त्यांच्यावर कारवाई करावी यासाठी एम.आय.डी.सी. 2021 मध्ये वारंवार तक्रारी केल्या आणि कारवाई करण्यासाठी पाठपुराव केला परंतु अधिका-यांनी दाद लागू दिली नाही. त्यामुळे अखेर 8 डिसेंबर 2021 रोजी लोकायुक्ताकडे तक्रार केली. त्याची त्यांनी दखल घेत 12 बडया उद्योजकांच्या अतिक्रमणांवर कारवाईचा बडगा उचलला.
बेकायदेशीरपणे अतिक्रमण करणा-यांच्या विरोधात माझा लढा आहे. नगरपालिका प्रशासनाचे काम सर्वसामान्यांना केंद्रबिंदू मानून सुरु आहे. मात्र चुकीच्या बाबी गळी उतरवण्यासाठी काही व्यक्ती त्यांच्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न करत आहेत. शहरातील वाढती अतिक्रमणे ही मोठी समस्या बनली असून त्याच्यावर मार्ग काढावा हाच हेतू आहे. शहरातील बडया व्यासायिकांच्या अतिक्रमणांबाबतही वारंवार तक्रारी केल्यानंतर पालिका प्रशासन त्यांना शास्तीच्या नोटीसा काढते आणि त्यातून आर्थिक वर्षात 80 लाखांच्या आसपास शास्ती वसूल केले जाते परंतु हे नागरिकांपर्यंत पोहचत नाही. मी तक्रारी केल्यानंतर त्याचा पाठपुराव करतो, कारवाई झाली नाही तर आंदोलन, उपोषण करतो त्यामुळे प्रश्न मार्गी लागतो, त्यामुळे काहीजणांना पोटशूळ उठत आहे. रजताद्री हॉटेलच्या घरपट्टी वसुलीबाबतही मी वारंवार पाठपुरावा केल्यामुळे 70 ते 80 लाख घरपट्टी वसूल झाली आहे. रजताद्री परिसरात बेकायदेशीर वृक्षतोड झाली आहे त्याचाही पाठपुरावा नगरपालिकेकडे सुरु असून माझ्याकडे लहान-मोठा असा भेदभाव नाही. त्याचप्रमाणे वासनाकांडप्रकरणात जे तुरुगांची हवा खावून आले आहेत, त्यांचे बेकायदेशीर धंदे आहेत, त्यांनी माझ्यावर बिनबुडाचे आरोप करु नयेत. माझ्याविरोधात ज्यावेळेस ते फक्त अतिक्रमणच नाही तर मी उपस्थित केलेल्या प्रत्येक आंदोलनाबाबत पुराव्यानिशी मी भेदभाव करत असल्याचे सिध्द करतील त्यावेळेस त्यांनी पोलिसांत तक्रार करावी आणि ते सिध्द झाल्यास सातारकरांसाठी माझी कारागृहातसुध्दा जाण्याची तयार आहे.
सातारकर नागरिक विविध रुपाने नगरपालिकेला टॅक्स भरतात. त्यांना सोयी सुविधा मिळाल्या पाहिजेत. अतिक्रमणांनी फुटपाथ व्यापले आहेत. अतिक्रमणांमुळे सार्वजनिक ठिकाणी पार्किंगलाही पुरेशी जागा राहिलेली नाही. सर्वसामान्य सातारांचा विचार करणे आवश्यक आहे. सर्वसामान्य व्यक्ती संघटित नसल्याचा कुणी गैरफायदा घेवू नये.दुकानदारी चालावी यासाठी काहीजणांची सध्या स्टंटबाजी सुरु आहे. चुकीचा पायंडा पाडण्याचा प्रयत्न सुरु आहे. शहराच्या सर्वांगिण विकासाच्यादृष्टीने नगरपालिका प्रशासन प्रयत्न करत असताना अतिक्रमणांच्या माध्यमातून शहर बकाल होत आहे. हातगाड्यांचा आणि टपर्यांचा सातारा, अशी शहराची ओळख होणे योग्य आहे का? सर्वसामान्य सातारकर आणि विक्रेते यांच्यापैकी कुणावरही अन्याय होवू नये ही भूमिका आहे. शहरातील हॉकर्सची नावे पुढे करुन काहीजण स्वार्थ साधण्याचा प्रयत्न करत आहेत. शहरातील हॉकर्सना नियमानुसार जागा मिळवून का दिली जात नाही? स्वत:ला पदाधिकारी म्हणून घेतात ते पाठपुरावा का करत नाहीत? जे चुकीचे आहे त्याला मी विरोधच करणार आहे. शेतकर्यांप्रमाणे विक्रेतेही कष्टकरी आहेत. मात्र शेतीमालाला दर मिळाला नाही म्हणून शेतकर्यांनी कधी गांजाची शेती करण्याचा आग्रह धरला नाही किंवा गांजाची शेती केली नाही. त्यामुळे बेकायदेशीर अतिक्रमणे ही कधीही अधिकृत होवू शकत नाहीत. रस्त्यावर केल्या जाणार्या अतिक्रमणांना नगरपालिका प्रशासनाने शहरात ठिकठिकाणी पर्यायी जागा दिल्या होत्या. मात्र काहीजणांच्या आडमुठे धोरणामुळे रस्त्यावर अतिक्रमणे होतात. परिणामी वाहतूक कोंडी, अपघात यांसारख्या सामाजिक समस्या निर्माण होतात. नागरिकांच्या आग्रहाखातर तसेच सामाजिक प्रश्न असल्याने त्यावर तोडगा काढण्यासाठी आम्हाला उपोषण, आंदोलन करावे लागते. त्यामुळे नाईलाजाने नगरपालिका प्रशासनाला अतिक्रमणांवर कारवाई करते. मूळ विषय बाजूला ठेवून काहीजण त्याचा विपर्यास करुन दिशाभूल करत आहेत.
काहीजण कोर्टाचा संदर्भ देवून चुकीची माहिती माध्यमांना देत आहेत. त्यांनी फेरिवाला धोरण काय आहे हे जाणून घ्यावे. पथविक्रेता (उपजिविकेचे संरक्षण व पथविक्री विनियमन) (महाराष्ट्र) 2017 हा नगर किास खात्याचा जीआर आहे. त्यामध्ये पथविकेता कुणाला म्हणावे याबाबतीत स्पष्ट निर्देश आहेत. नगरपालिकेने बायोमेट्रिक सर्व्हे केला म्हणून संबंधित हॉकर्स हे अधिकृत होत नाहीत. पथविक्रीखेरीज उपजीविकेची इतर कोणतीही साधणे असणार नाहीत. याबाबतचे प्रतिज्ञापत्र नगरपालिकेला सादर करणे आवश्यक आहे. असे प्रतिज्ञापत्र एकाही हॉकर्सने नगरपालिकेला सादर केले नसल्याची अधिकृत माहिती आहे.
पथविक्रेता म्हणून नोंदणी केल्यामुळे पथविक्री करण्याचा हक्क प्रदान होत नाही. त्यामध्ये नगरपालिकेच्या सक्षम प्राधिकार्याने नोंदणी प्रमाणपत्र, पथविक्री प्रमाणपत्र आणि ओळखपत्र दिल्याशिवाय केवळ पथविक्रेता म्हणून नोंदणी केल्यामुळे किंवा यशस्वीरित्या नोंदणीकृत पथविक्रेता यादीमध्ये नाव प्रसिध्द झाल्यामुळे पथविक्री करण्याचा हक्क प्रदान होत नाही ही वस्तुस्थिती आहे. स्वत:ला पदाधिकारी म्हणवून घेणारे किंवा हॉकर्सचे आपणच हितचिंतक आहोत, अशा खोट्या अविर्भावात असणार्यांनी ही वस्तुस्थिती शहरातील विक्रेत्यांसमोर, हॉकर्ससमोर कधीही येवू दिली नाही. शहरातील शेकडो हॉकर्सना अंधारात ठेवण्याचे पाप त्यांनी केले. त्यांच्या असहाय्यतेचा गैरफायदा घेवून, त्यांना कारवाईची भीती घालून स्वत: हप्ते वसुली करत राहिले. नगरपालिकेच्या तोंडावर काही माजी नगरसेवकही स्टंटमध्ये सहभागी आहेत. मात्र येत्या तीन-चार महिन्यात त्यांचा खरा चेहरा सातारकरांसमोर आणणार आहे. विक्रेत्यांबद्दल यांचा कळवळा खोटा आहे. विक्रेत्यांची ढाल करुन लबाडीने त्यांना स्वत:ची दुकानदारी चालवायची आहे. स्वच्छ व सुंदर सातारा करण्यासाठी दोन्हीही नेते प्रयत्न करत आहेत. त्यामध्ये विक्रेत्यांनीही योगदान देणे आवश्यक आहे. सर्वसामान्य सातारकरांचा विचार करुन त्यांची गैरसोय दूर करण्यासाठी नगरपालिका प्रशासनाला सहकार्य करावे, अशी विनंती आहे. मुख्याधिकारी अभिजित बापट आणि त्यांच्या कर्मचा-यांनी भेदभाव न करता छोटया-मोठयांची अतिक्रमणे तात्काळ काढावी. जोपर्यंत प्रशासन चांगले काम करत असते त्यावेळी मी त्यांच्या पाठीशी असतो त्यांचीही कारवाई कोणाच्याही दबावाला बळी न पडता पुढे सुरु ठेवावी अन्यथा मला न्यायालयात दाद मागावी लागेल.
You must be logged in to post a comment.