‘मुलगी झाली हो’ मालिकेतून अभिनेता किरण मानेला काढलं

सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा): मुलगी झाली हो’ मालिकेत विलास पाटीलची भूमिका साकारणारा अभिनेता किरण माने यांना मालिकेतून तडकाफडकी काढून टाकण्यात आलं आहे. किरण हे त्यांच्या भूमिकांसोबतच सोशल मीडियावर परखडपणे मत व्यक्त करण्यासाठीही ओळखले जातात. त्यांच्या अनेक पोस्टची सोशल मीडियावर चर्चा होत असते. मात्र आपलं मत स्पष्टपणे मांडणं त्यांना आता भोवलं आहे. एक पोस्टमुळे त्यांना ‘मुलगी झाली हो’ या मालिकेतून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे.

किरण माने यांनी गुरुवारी सायंकाळी फेसबुकवर एक पोस्ट केली होती. “काँट लो जुबान, आंसुओं से गाऊंगा… गाड दो बीज हूँ मैं, पेड बन ही जाऊंगा!,” असा मजकूर या पोस्टमध्ये आहे. आपल्याला संपवण्याचा प्रयत्न केला तरी आपण पुन्हा नव्याने उभारी घेऊ असे संकेत किरण मानेंनी आपल्या पोस्टमधून दिलेत. किरण मानेंनी एका दैनिकाशी बोलताना, “होय, मला मालिकेतून काढून टाकले आहे. मला तासाभरापूर्वीच चॅनेलने ही माहिती दिली,” असं म्हटलंय. किरण मानेंनी त्यांच्यावर झालेल्या कारवाईच्या वृत्ताला दुजोरा दिला.


#istandwith_KiranMane हा हॅशटॅग सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरतोय. अनेकांनी याला संस्कृतिक दहशतवाद म्हटलंय.सोशल मीडियावर किरण मानेंविरोधात वाहिनीने केलेल्या कारवाईवरुन संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत. अनेक चाहत्यांनी उघडपणे किरण मानेंना या प्रकरणामध्ये पाठिंबा दर्शवला आहे.

error: Content is protected !!