श्रमिक मुक्ती दलाच्या कार्यकर्त्यांना स्थानबद्ध केल्याबद्दल प्रशासनाने माफी मागावी : डाॅ. पाटणकर

सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) : श्रमिक मुक्ती दलाच्या चाळीस वर्षाच्या इतिहासात कधीही जाहीर केल्याशिवाय कोणताही कार्यक्रम किंवा आंदोलन, सत्याग्रह केला जात नाही, अशी ख्याती आहे. असे असताना पाटण तालुक्यातील कोयनानगर या ठिकाणी मुख्यमंत्री यांच्या दौऱ्यावेळी श्रमिक मुक्ती दलाच्या कार्यकर्त्यांना स्थानबद्ध करणे ही बाब अत्यंत वेदनादायक व शासनाची प्रतिमा मलिन करणारी असून प्रशासनाने याबद्दल माफी मागावी, अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा श्रमिक मुक्ती दलाचे अध्यक्ष डॉ. भारत पाटणकर यांनी सातारा येथे झालेल्या पत्रकार परिषदेत दिला.

अतिवृष्टी झाल्यामुळे पाटण तालुक्यात मोठया प्रमाणात दरड कोसळून नुकसान झाले आहे. ढोकवळे, मिरगाव या कोयना प्रकल्पग्रस्तांच्या गावात जीवित हानी झाली आहे. तर बाजे येथील अडकलेल्या लोकांना बोटीने बाहेर काढण्यासाठी संघटनेचे कार्यकर्ते सक्रिय होते. कालपर्यंत श्रमिक मुक्ती दलाचे कार्यकर्ते चैतन्य दळवी, महेश शेलार, सचिन कदम, हे अतिशय प्रतिकूल परिस्थितीत भर पावसात मदत कार्यात प्रशासन आणि एनडीआरएफ टीम यांच्या बरोबर आघाडीवर होते. प्रशासन पोहचू शकत नव्हते तेव्हा ही श्रमिक मुक्ती दलाची टीम पोहोचली होती. असे असताना मुख्यमंत्री यांच्या दौऱ्यावेळी मदतकार्यात पुढाकारात असलेल्या कार्यकर्त्याना कोयनानगर पोलीस ठाण्यात स्थानबद्ध करून ठेवणे आणि मोबाईल काढून घेणे हे राजकीय षडयंत्र असून सत्य परिस्थिती ही मुख्यमंत्री यांच्या पर्यंत पोहचू नये, यासाठी रचलेली ही बाब अत्यंत खेदजनक व निंदनीय आहे, असेही डाॅ. भारत पाटणकर यांनी सांगितले.

कोयना धरण आणि प्रकल्पग्रस्तांना धरणाच्या लाभ क्षेत्रातच करावे. शासनाने जमीन शिल्लक असताना प्रशासन जमीन लपविण्याचे काम करीत आहेत. लोकांचे स्थलांतर करुन त्यांच्या नशीबी पुन्हा उपासमारीच येणार असलेच. तर कोयनेत राहिलेलं बरं. उपमुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीत जमीन देण्याचे आश्वासन दिले जाते. मात्र, प्रत्यक्षात काहीच दिले जात नाही. ही फसवणूक आहे. याबाबत शासनाने योग्य तो निर्णय घ्यावा, अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा पाटणकर यांनी दिला.

error: Content is protected !!