सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) : हद्दवाढीनंतर सातारा पालिकेत आलेल्या भागातील विकासकामांसाठी ५१ कोटी रुपयांचा आराखडा तयार करण्यात आला होता. इतर तांत्रिक बाबी पूर्ण झाल्यानंतर तो आराखडा नगरविकास विभागास सादर करत नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेत निधीसाठीचा पाठपुरावा सुरू होता. यामुळे विस्तारित भागातील विकासकामांसाठी ४८ कोटी खर्चाच्या प्रस्तावास मंजुरी दिल्याची माहिती खासदार उदयनराजे भोसले यांनी पत्रकाद्वारे दिली.
याच पत्रकात त्यांनी कामांसाठी प्रस्तावित केलेल्या निधीचा पहिला हप्ता लवकरच पालिकेकडे वर्ग होणार असून, पालिकेच्या नूतन प्रशासकीय इमारतीसाठी १० कोटी रुपये मिळाल्याचेही नमूद केले आहे.
पत्रकात नमूद केले आहे, की पालिकेची ४० वर्षे प्रलंबित असणारी हद्दवाढ शासनाने मंजूर केल्याने शाहूपुरी, शाहूनगर, विलासपूर, खेड येथील भाग पालिकेत आला. यामुळे हद्दवाढीतील भागास सुविधा पुरविण्याची जबाबदारी पालिकेवर येऊन पडली. या भागातील नागरिकांना आवश्यक त्या सुविधा पुरविण्याचे आदेश पालिका प्रशासनास देत आम्ही त्याठिकाणचा विकास आराखडा तयार केला. या आराखड्यानुसार विविध विकासकामांसाठी ५१ कोटी आवश्यक होते.यामध्ये रस्त्यासाठी सुमारे २९ कोटी, गटारसाठी १० कोटी, सार्वजनिक दिवाबत्तीसाठी साडेतीन कोटी, मोकळ्या जागांच्या विकासासाठी ४ कोटी ६३, तसेच रुस्ते रुंदी व मजबुतीकरणासाठी निधी आवश्यक होता. पालिकेने सादर केलेल्या आराखड्यानुसार शासनाने ४८ कोटींच्या आराखड्यास मंजुरी दिली असून, त्याचा पहिला हप्ता लवकरच पालिकेस प्राप्त होणार आहे. त्यातून विकासकामे मार्गी लागतील, असा विश्वासही त्यांनी पत्रकात नमूद केला आहे. शाहूनगरच्या विस्तारित पाणीपुरवठा योजनेसाठी शासनाकडून २८ कोटींचा निधी सुद्धा लवकरच मिळाले, अशी माहितीही त्यांनी पत्रकात दिली.
You must be logged in to post a comment.