शंभर रुपयांच्या स्टॅम्पच्या कृत्रिम टंचाईप्रकरणी सागर भोगावकर यांचा आक्रमक पवित्रा
सातारा,(भूमिशिल्प वृत्तसेवा) : सातार्यात तहसील कार्यालय परिसरात स्टॅम्प विक्री करणाऱ्या स्टॅम्प वेंडर मंडळींकडून शंभर रुपयांच्या स्टॅम्पची कृत्रिम टंचाई केली जात असल्याच्या नागरिकांच्या तक्रारी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या वैद्यकीय मदत कक्षाचे राज्य उपाध्यक्ष सरदार (सागर) भोगांवकर यांचेकडे प्राप्त झाल्यानंतर गुरुवारी (दि.१२) त्यांनी एल्गार पुकारत आक्रमक पवित्रा घेतला व स्टॅम्प व्हेंडर यांच्या शेजारी उभे राहून याबाबत खातरजमा केली असता ही टंचाई फक्त कृत्रिम असल्याचे निदर्शनास आले. यानंतर त्यांनी आंदोलनाचा पवित्रा घेताच महसूल विभागाचे उपजिल्हाधिकारी संजय पाटील यांनी स्टॅम्प व्हेंडर मंडळींना आपल्या दालनात बोलावून सक्त ताकीद दिली. त्यामुळे उपस्थित सर्वसामान्य नागरिकांनी श्री.भोगावकर यांचे आभार मानले आहेत.
श्री.भोगांवकर यांना अनेक नागरिकांचे स्टॅम्प टंचाई असल्याबाबत आणि त्यामुळे होत असलेल्या त्रासाबद्दल फोन आले. यानंतर त्यांनी त्याची खातरजमा करण्यासाठी तत्काळ तहसिलदार कार्यालय गाठले. याठिकाणी स्टॅम्प व्हेंडर यांच्या शेजारी उभे राहून त्यांनी पाहणी केली असता संबंधित स्टॅम्प व्हेंडर हे शंभर रुपयांचे स्टॅम्प शिल्लक नसल्याचे बर्याच जणांना सांगून तसेच काही जणांकडून पन्नास रुपये ज्यादा घेवून त्याची विक्री करताना आढळून आले.
श्री. भोगावकर यांना ही बाब खटकताच त्यांनी याबाबतची माहिती महसूल विभागाचे उपजिल्हाधिकारी संजय पाटील यांना दिली. तसेच सर्वसामान्यांच्या प्रश्नासाठी वेळ पडली तर आंदोलनाचीही तयारी असल्याचे सांगितले.सागर भोगावकर यांच्या आंदोलनाच्या इशार्यानंतर उप जिल्हाधिकारी श्री. पाटील यांनी संबंधित स्टॅम्पव्हेंडर यांना आपल्या दालनात बोलावून खडे बोल सुनावले. यानंतर सर्व स्टॅम्प व्हेंडर यांनी सर्वसामान्य इच्छुक ग्राहकांना शंभर रुपयांचे स्टॅम्प वितरीत करण्यास सुरुवात केली.
दरम्यान, भोगावकरांनी घेतलेल्या या भूमिकेमुळे सर्वसामान्यांच्या खिशाला चारशे रुपयांची बसणारी झळ वाचली आहे. त्यामुळे उपस्थितांनी श्री. भोगावकर यांना धन्यवाद दिले आहेत.
…तर त्यांचा परवाना रद्द करू : प्रांताधिकारी सुधाकर भोसले
जर कोणी शंभर रुपयांचे स्टॅम्प देण्यासाठी अडवणूक करीत असेल तर वेळप्रसंगी त्यांचा परवाना रद्द करण्यात येईल, सेल्फ ॲटेस्टेड असेल तर शंभर रुपयांच्या स्टॅम्पला आमची कोणतीच आडकाठी नसल्याची प्रतिक्रिया प्रांताधिकारी सुधाकर भोसले यांनी व्यक्त केली असून तशा सक्त सूचना संबंधितांना दिल्या आहेत.
You must be logged in to post a comment.