‘
सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) : नॅशनल फेडरेशन न्यू दिल्ली, या राष्ट्रीय स्तरावरील केंद्रीय शिखर संस्थेकडून अजिंक्यतारा सहकारी साखर कारखान्यास जाहीर झालेला ‘हायस्ट शुगर रिकव्हरी इन हाय रिकव्हरी एरीया’ इफिशियन्सी पुरस्कार माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार, केंद्रीय सहकार मंत्री ना. बी.एल. वर्मा, राज्याचे गृहमंत्री ना. दिलीप वळसे- पाटील, आरोग्यमंत्री ना. राजेश टोपे, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, संस्थेचे पदाधिकारी आदी मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
दिल्लीमध्ये आयोजित कार्यक्रमात अजिंक्यतारा कारखान्याचा गौरव करून शरद पवार यांच्यासह मान्यवरांनी कारखान्याच्या कामकाजाचे कौतुक केले.
दिल्ली येथे आयोजित दिमाखदार सोहळ्यात अजिंक्यतारा कारखान्याला सन्मानित करण्यात आले. कारखान्याच्या वतीने चेअरमन सर्जेराव सावंत, व्हा. चेअरमन विश्वास शेडगे, संचालक नितीन पाटील, महेंद्र पवार, शेती अधिकारी विलास पाटील, चीफ केमिस्ट सुरेश धायगुडे यांनी पुरस्कारचा स्विकार केला. यावेळी महाराष्ट्र राज्य सहकारी साखर संघाचे अध्यक्ष जयप्रकाश साळुंखे- दांडेगावकर, संजय भुसार रेड्डी (उत्तर प्रदेश), राष्ट्रीय साखर संघाचे कार्यकारी संचालक प्रकाश नाईक नवरे आदी मान्यवर उपस्थित होते.
नॅशनल फेडरेशनकडून यापूर्वी सन २०१९-२० च्या हंगामाकरीता अजिंक्यतारा कारखान्यास ‘बेस्ट केन डेव्हलपमेंट इन हाय रिकव्हरी एरिया’ पुरस्कार प्राप्त झाला होता. सलग दुसऱ्या वर्षी शिखर संस्थेचा पुरस्कार मिळाल्याने देशाच्या सहकार क्षेत्रात कारखान्याच्या नावलौकिकात भर पडली आहे. आतापर्यंत अजिंक्यतारा कारखान्यास कारखान्याची तांत्रिक गुणवत्ता, कार्यक्षमता व अत्युत्तम उत्पादन क्षमतेच्या आधारे देश व राज्यस्तरावरून एकूण २८ पुरस्कार प्राप्त झालेले आहेत.
You must be logged in to post a comment.