किल्ले अजिंक्यतारा, प्रतापगड राष्ट्रीय स्मारक म्हणून घोषित करा

सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा): छत्रपती शिवाजी महाराजांनी मोठ्या पराक्रमाने आणि शौर्याने स्वराज्याची निर्मीती केली. हाच ऐतिहासिक ठेवा भावी पिढीसाठी प्रेरणादायी असून त्याच्या संवर्धनासाठी राष्ट्रीय पातळीवर प्रयत्न होणे गरजेचे आहे.विशेषत: किल्ले अजिंक्यतारा आणि प्रतापगडाचे ऐतिहासिक महत्व लक्षात घेवून केंद्र सरकारने या किल्यांचे राष्ट्रीय स्मारक म्हणून घोषित करून त्यांचे संवर्धन करावे,अशी मागणी भाजपा खा.उदयनराजे भोसले यांनी देशाचे उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांच्याकडे भेट घेऊन केली आहे.

मराठा साम्राजाची राजधानी असलेल्या सातारा येथील अजिंक्यतारा किल्याला फार मोठे ऐतिहासिक महत्व आहे.सातारा शहरात मोठ्या डौलाने उभा असलेला हा किल्ला जतन करण्याची मागणी केली. त्याचबरोबर प्रतापगडाची लढाई ही महाराष्ट्राच्या इतिहासातील एक महत्त्वाची लढाई आहे. ही मराठा साम्राजाच्या इतिहासातील सर्वात रोमांचक घटना मानली जाते. शिवाजी महाराजांनी अदिलशहाचा सेनापती अफजलखानाच्या रूपाने आलेले स्वराज्यावरील संकट परतवून लावताना, त्याचा शेवट करून याच मातीत त्याची कबर बांधली. या लढाईत महाराजांनी गनिमी काव्याने शत्रूला संपवले नसते तर इतिहास कदाचित वेगळा इतिहास पाहायला मिळाला असता. इतकच नाही तर स्वराज्याची निर्मीती सुद्धा झाली नसती.आणि या देशातील लोकशाही पाहायला मिळाली नसती. त्यामुळे,महाराजांच्या गनीमीकाव्याचा इतिहास प्रतापगडाच्या रूपाने जतन करावा जेणेकरून तो साऱ्या जगाला प्रेरणादायी ठरेल,त्यासाठी प्रतापगडला राष्ट्रीय स्मारक म्हणून घोषित करण्याची मागणी उदयनराजे भोसले यांनी यावेळी केली आहे.

तसेच,सातारा जिल्ह्याला सुमारे २० किल्ल्यांचा ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे. तसेच १८ धरणांची देणगीसुद्धा सातारा जिल्ह्याला मिळाली आहे.त्याचबरोबर आशिया खंडातील सर्वात मोठा पवनचक्कीचा प्रकल्प हा सुद्धा साताऱ्यात आहे. इतकच नाही तर संपूर्ण महाराष्ट्राच्या वीजेच्या मागणीपैकी जवळपास ३० टक्के वीज निर्मिती ही साताऱ्यात होते.तशीच संपूर्ण देशात पर्यटनामध्ये अव्वल स्थानावरचे महाबळेश्वरसारखे थंड हवेचे ठिकाणसुद्धा सातारा जिल्ह्याला लाभले आहे. याच महाबळेश्वर परिसरांतील स्ट्राॅबेरी जगाच्या नकाशावर आली आहे. सर्वात अभिमानाची बाब म्हणजे रंगबिरंगी फुलानी बहरून जाणाऱ्या कास पठाराला जागतिक वारसा लाभला आहे.त्यामुळे,अशा विविधतेने नटलेल्या सातारा जिल्ह्याची शान वाढवणाऱ्या प्रतापगड आणि अजिंक्यतारा हे दोन्ही किल्ले राष्ट्रीय स्मारक म्हणून संरक्षित करण्याची मागणी खा.उदयनराजे यांनी उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांच्याकडे केली.

error: Content is protected !!