तिसरी लाट थोपविण्यासाठी ‘पोर्टेबल कोविड हाॅस्पिटल’ची निर्मिती : अजित पवार

वडूज, (भूमिशिल्प वृत्तसेवा) : ‘कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेला थोपविण्यासाठी वडूज येथे उभारलेले पोर्टेबल कोविड हॉस्पिटल जीवनदायी ठरणार आहे. शरद पवार यांच्या पाठीशी राहणाऱ्या खटाव-माण तालुक्यातील जनतेची दखल राष्ट्रवादीने सदैव घेतली आहे. उत्कृष्ट प्रशासक म्हणून नावलौकिक मिळविलेल्या प्रभाकर देशमुख यांचे या हॉस्पीटलसाठीचे योगदान महत्त्वपूर्ण ठरले,’ असे गौरवोद्गार उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काढले.

वडूज येथे शनिवारी शंभर बेडच्या अत्याधुनिक पोर्टेबल कोविड सेंटरच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी पालकमंत्री बाळासाहेब पाटील, विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर, माजी सनदी अधिकारी प्रभाकर देशमुख, नगराध्यक्ष सुनील गोडसे, मँथ्यू जोसेस, साकेल झा, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष उदय कबुले, उपाध्यक्ष प्रदीप विधाते , तहसीलदार किरण जमदाडे उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, ‘कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेपूर्वीच राज्यशासनाने गंभीर दखल घेत आरोग्य यंत्रणा सतर्क ठेवली आहे. वडूज येथील पोर्टबल कोविड हॉस्पीटल हे याचेच द्योतक ठरत आहे. नैसर्गिक संकटाबरोबरच कोरोला राज्य सरकार धीराने सामोरे जात आहे. जिल्ह्यातील आरोग्य विभागासह इतर विभागाने या काळात फार मोठे योगदान दिले आहे. आर्थिक संकट पुढे असलेतरी सरकार आरोग्याच्या दृष्टीने कोठेही कमी पडणार नाही. लोकांनीही आपली जबाबदारी ओळखून सतर्क राहावे.’

error: Content is protected !!