होम आयसोलेशन कमी करा आणि कॉन्टॅक्ट ट्रेसिंग करा : अजित पवार

सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) : सातारा जिल्ह्यातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे कॉन्टॅक्ट ट्रेसिंग करा. ग्रामीण भागातील होम आयसोलेशन कमी करावे. कोरोना चाचण्या सीसीसी, डीसीएचसीमध्ये करा. बाहेर अजिबात पाठवू नका. तसेच लसीकरणावेळी योग्य बंदोबस्त ठेवा, असे आदेश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले.

सातारा जिल्हा परिषदेच्या दिवंगत यशवंतराव चव्हाण बहुउद्देशिय सभागृहात कोरोना आढावा बैठक झाली. या बैठकीला माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, पालकमंत्री बाळासाहेब पाटील, आरोग्यमंत्री राजेश टोपे, गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई, खासदार श्रीनिवास पाटील, जिल्हा परिषद अध्यक्ष उदय कबुले, जिल्हाधिकारी शेखर सिंह, मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा व विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

जिल्ह्यातील सर्व शासकीय आणि खासगी रुग्णालयांचे फायर, आॅक्सिजन, स्ट्रक्चरल आणि इलेक्ट्रीकल आॅडिट पूर्ण करुन घ्या, असे सुरुवातीलाच उपमुख्यमंत्री पवार यांनी सांगत जिल्हाधिकारी आणि मुख्य कार्यकारी अधिकाºयांना तपासणी व खरेदीबाबत अधिकार दिल्याचे स्पष्ट केले. तसेच खासगी लॅब या नियमानुसार काम करत नसतील त्यांचे रजिस्ट्रेशन रद्द करुन गुन्हे दाखल करा, असेही स्पष्टपणे सांगितले.

कोरोना काळात नवीन पद निर्मिती, आरोग्य भरती तत्काळ पूर्ण करुन घ्यावी, असे सांगत उपमुख्यमंत्री पवार यांनी जिल्ह्यातील खासगी रुग्णालयातील बील आॅडिट दररोज करा. त्यासाठी दोन शिफ्टमध्ये कर्मचारी नेमून सर्वांचा वापर करुन घ्या. कोरोना लसीकरण केंद्रावर पोलीस बंदोबस्त ठेवा. आमदार, खासदार किंवा कोणत्याही लोकप्रतिनिधींचा यामध्ये हस्तक्षेप नको. आमदार निधीमधीलही व्हेंटिलेटर तत्काळ खरेदी करा. नाहीतर कारवाई करणार, असा इशाराही दिला.कोरोना काळात काम केलेल्या डॉक्टर व कर्मचाºयांना नियमीत भरतीत ठराविक कोटा ठेवूया. तसेच कंत्राटी डॉक्टरांचे मानधन वाढवा. शिक्षकांकडून कॉन्टॅक्ट ट्रेसिंग व्यवस्थित होत नसल्याचे दिसून आले आहे. बांधकाम विभागांच्या अभियंत्यांनी बाहेर फिरावे, पोलीस अधीक्षकांनीही यंत्रणा हलवावी, असेही त्यांनी सुनावले.

‘ कोरोनासाठी निधी कमी पडू देणार नाही. पण, या संकटाच्या दुसºया लाटेत बेफिकीरपणे काम सुरू आहे. १५ टक्केच कर्मचारी काम करत असून इतर घरी बसून पगार घेतात. पगाराप्रमाणे काम करुन घ्या. कोणाचेही लाड करु नका. लॉकडाऊन आणखी कडक करा. जिल्ह्यातील बाधित कमी करा नाहीतर कारवाई होणारच. मी अजिबात खपवून घेणार नाही,’ असा सज्जड दम उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिला. त्याचबरोबर यंदा पाई वारी नको, असेही त्यांनी सुचित केले.

error: Content is protected !!