राज्यात एकही मुलगी शाळाबाह्य राहणार नाही : ना.वर्षा गायकवाड

नायगाव, ता. खंडाळा येथे ना. छगन भुजबळ, वर्षा गायकवाड, आमदार मकरंद पाटील यांनी महात्मा जोतिबा व सावित्रीबाईं फुले यांच्या पुतळ्यास अभिवादन केले.

सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) : आज प्रत्येक क्षेत्रात महिला काम करीत आहे हे फक्त क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या संघर्ष व त्यागातून शक्य झाले. अनेक अडचणींवर मात व समस्यांना तोंड देवुन त्यांनी आपले काम अखंड सुरु ठेवले.  त्यांचा जन्म दिवस आता महिला शिक्षण दिन म्हणून महाराष्ट्रात साजरा होणार आहे. फुले दापंत्यांचे काम  काम ऊर्जा व प्रेरणा देणार असून महाराष्ट्रातील एकही मुलगी शाळाबाह्य राहणार नाही यासाठी प्रयत्न करु. त्यांचे विचार गाठीशी बांधून कार्य करु, अशी आशा शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी व्यक्त केली.

क्रांतीज्योति सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त नायगाव ता. खंडाळा येथील कार्यक्रमात त्या बोलत होत्या. कार्यक्रमास अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ, सहकार व पणन तथा जिल्ह्याचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील, शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड, गृह राज्यमंत्री शंभूराज देसाई, खासदार श्रीनिवास पाटील, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष उदय कबुले, आमदार मकरंद पाटील, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष प्रदिप विधाते, माजी खासदार समीर भुजबळ, खंडाळा पंचायत समितीचे सभापती राजेंद्र तांबे यांनीही क्रांतीज्योति सावित्रीबाई फुले यांच्या स्मारकास अभिवादन केले.

भुजबळ म्हणाले, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले व महात्मा ज्योतिराव फुले यांचे कार्य ऊर्जा व प्रेरणा देणार असून क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचा जन्मदिवस महिला शिक्षण दिवस म्हणून साजरा करण्याचा राज्य शासनाने निर्णय घेतला आहे. हा महिला शिक्षण दिन संपूर्ण भारतात साजरा व्हावा यासाठी केंद्राकडे प्रस्ताव पाठविणार आहे. फुले दांपत्यानी समाज परिवर्तनाचे मोठे काम केले आहे. यामुळेच आज प्रत्येक क्षेत्रात महिला पुरुषांबरोबर काम करीत आहे. क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले अखेरच्या श्वासापर्यंत लोकांसाठी काम करीत राहिल्या. त्यांच्या कार्याचाही गौरव ब्रिटीश सरकारने केला. महाराष्ट्र शासनाने क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त महाराष्ट्रात महिला शिक्षण दिन साजरा करण्यात येणार आहे. या निमित्ताने प्रत्येक शाळा, महाविद्यालयांमध्ये विविध कार्यक्रम घेऊन फुले दांपत्यांनी केलेल्या कार्याचीही माहिती सर्व विद्यार्थ्यांपर्यंत पोहचविण्यात येणार असल्याचेही भुजबळ यांनी शेवटी सांगितले.

error: Content is protected !!