सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) : स्वच्छ सर्वेक्षणात सातारा नगरपालिकेने, राज्यात 4 क्रमांक तर देशातील 372 पालिकांमध्ये 15 वा क्रमांक मिळवला आहे. सदरचा सन्मान निश्चितच नगरपालिकेचा आत्मविश्वास वाढवणारा आहे. या महत्वपूर्ण सन्मान सातारकर नागरीकांच्या अमुल्य योगदानामुळेच मिळाला आहे, त्यामुळे हा सन्मान सर्व सातारकर जनतेचा सन्मान आहे, असे उद्घगार खासदार उदयनराजे भोसले यांनी काढले आहेत.
खासदार उदयनराजे म्हणाले, सातारा नगरपरिषदेला यापूर्वीच ओडीएफ प्लस चा दर्जा मिळालेला आहे. घरोघरी घंटागाडीव्दारे कचरा गोळा करणारी पश्चिम महाराष्ट्रातील पहिला नगरपालिका सातारा ठरली होती. ओला कचरा, सुका कचरा याचे घंटागाडीतच विलगीकरण करुन वाहुन नेणे, कचरा डेपोवर त्याचे शास्त्रीय वर्गीकरण, अलगीकरण करणे, शहरात कचरा साठु नये यासाठी मंडई-बाजार याठिकाणचा कचरा त्वरीत हलवणे, घनकचरा व्यवस्थापनाचे टप्पे कार्यान्वित करणे, इत्यादी अनेक छोटया ठया उपाययोजनांमुळे स्वच्छ सर्वेक्षणात यंदाच्या वर्षी चौथे स्थान राज्यात प्राप्त झाले आहे. अर्थात मोठया प्रमाणात सातारकर नागरीकांनी, घंटागाडीतच कचरा टाकण्याची सकारात्मक मानसिकता तयार केल्यामुळे, हे विविध निकषावरील तुलनात्मक यश मिळालेले आहे.
सातारकर नागरीक नेहमीच स्वच्छतेच्या बाबतीत जागरुक आणि प्रामाणिक आहेत. खरेतर त्यांनी सहकार्य केल्यामुळेच हे यश मिळाले आहे. त्यामुळे हे यश टिकवून त्यामध्ये अधिक उंच पातळी गाठणे ही प्रशासनाची नैतिक जबाबदारी आता वाढली आहे. यानिमित्ताने आम्ही सातारकर नागरीक, नगरपरिषदेचे पदाधिकारी, सदस्य, प्रशासनातील सर्व घटक यांचे मनापासून अभिनंदन करतो. येथुन पुढील काळात, कोणती स्पर्धा आहे म्हणून नव्हे तर स्वयंप्रेरणेने नगरपरिषदेने कचरा संकलन, स्वच्छतेबाबतच्या चालु असलेल्या उपक्रमात सातत्य ठेवून, आणखी उपयुक्त विविध उपाययोजना, नागरीकांच्या सहभागातुन अधिक कार्यक्षमतेने राबवल्या पाहीजेत. आजच्या यशाचे निश्चितच समाधान आहेच परंतु मराठा साम्राज्याची राजधानी सातारा नगरी स्वच्छ सर्वेक्षणामध्ये देशामध्ये अव्दितीय ठरली पाहीजे अशी अपेक्षा आहे. त्यावेळी आम्हाला खरे समाधान मिळेल.
You must be logged in to post a comment.