शशिकांत शिंदेवरील आरोप न्यायालयीन निर्णयावर आधारित : उदयनराजे

कराड येथील नियोजित मोदींच्या सभा स्थळाची उदयनराजेंनी केली पाहणी

कराड,(भूमिशिल्प वृत्तसेवा): कोरेगावचे आमदार महेश शिंदे आणि माथाडी नेते नरेंद्र पाटील यांनी शशिकांत शिंदे यांच्यावर जे आरोप केले आहेत, ते न्यायालयीन निर्णयावर आधारित आहेत. भ्रष्टाचाराच्या घटनांवर आवाज उठवणे हे लोकप्रतिनिधींचे कामच आहे. तर चुकलं काय असा सवाल उदयनराजेंनी विचारला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची ३० एप्रिल रोजी कराड येथे जाहीर सभा होणार आहे. या सभेच्या जागेची पाहणी आज खासदार उदयनराजे भोसले यांनी केली. यावेळी माध्यमांशी ते बोलत होते.याप्रसंगी भाजपचे जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम, डॉ. अतुल भोसले, मोहनराव जाधव, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य सागर शिवदास आदी उपस्थित होते.

उदयनराजे म्हणाले, मोदींच्या सभेसाठी सुंदर ठिकाण निवडलेले आहे. सभेसाठी भव्य मंडप उभारण्यात येणार असून एक लाख लोकांची आसनक्षमता या मंडपात तयार करण्यात येणार आहे. मागील निवडणुकीत मोदींची सभा सातारा शहरात झाली होती. या निवडणुकीत मतदारसंघातील सहा विधानसभा मतदारसंघांचा विचार करून कराडमध्ये सभा आयोजित करण्यात आली आहे. सभेच्या तयारीच्या अनुषंगाने उद्यापासून उपाययोजना हाती घेण्यात येणार आहे. या ठिकाणी असलेले एमएसईबी चे पोल शिफ्ट करावे लागणार आहेत. वाहनांच्या पार्किंगची व्यवस्था करण्यात येणार आहे. हेलिपॅड साठी देखील याच ठिकाणी व्यवस्था असेल. याबाबतच्या योग्य त्या सूचना प्रशासनाला करण्यात आल्या आहेत.

दरम्यान, मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीतील घोटाळ्यांबाबत वारंवार आरोप होत आहेत. विकासाच्या मुद्द्यावर चर्चा का होत नाही असे पत्रकारांनी विचारले असता छ .उदयनराजे म्हणाले, महायुतीचा जाहीरनामा हा लोकांच्या सर्वांगीण विकासासाठी तयार करण्यात आला आहे. तो सर्वांपर्यंत पोहोचवला जात आहे. तरी देखील कोरेगावचे आमदार महेश शिंदे आणि माथाडी नेते नरेंद्र पाटील यांनी जे आरोप केले आहेत, ते न्यायालयीन निर्णयावर आधारित आहेत. भ्रष्टाचाराच्या घटनांवर आवाज उठवणे हे लोकप्रतिनिधींचे कामच आहे. तर चुकलं काय असा सवाल देखील त्यांनी विचारला आहे.

लोकांचे प्रेम कधीच कमी झालं नाही..

लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने आपले जिल्हाभर दौरे होत आहेत, या दौऱ्यामध्ये लोकांचे भरभरून प्रेम आपल्यावर पाहायला मिळते आहे, याबाबत काय सांगाल, असे पत्रकारांनी विचारले असता छ.उदयनराजे म्हणाले लोकांचे प्रेम माझ्यावर कधीच कमी झालेले नाही. उलट ते वाढत चालले आहे.

error: Content is protected !!